राज्यातील शाळांची तपासणी होणार

शालेयवृत्त सेवा
0

 


पंधरा दिवस फिरणार पथके; साडेसात हजार कर्मचारी सज्ज ठेवणार





यवतमाळ ( शालेय वृत्तसेवा ) :

राज्यातील शाळांची गुणवत्ता तपासण्यासाठी आणि आगामी काळात विकासाचा आराखडा निश्चित करण्यासाठी तब्बल साडेपाच हजार शाळांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीसाठी तब्बल साडेसात हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली १९०० पथके सज्ज ठेवण्याचे आदेश सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.


महाविद्यालयांना ज्याप्रमाणे मूल्यांकन करून नॅक श्रेणी दिली जाते, त्याचप्रमाणे आता शाळांचेही मूल्यांकन केले जात आहे. त्यासाठी राज्य शाळा मानक प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा (स्कॉफ) तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकडून ३० जूनपर्यंत स्वमूल्यांकनाची प्रक्रिया करवून घेण्यात आली आहे. आता शाळांनी स्वमूल्यांकन करताना दिलेली माहिती खरी की खोटी, याची प्रत्यक्ष खात्री केली जाणार आहे. म्हणजेच शाळांचे बाह्यमूल्यांकन केले जाणार आहे. या बाह्यमूल्यांकनासाठी म्हणजेच शाळांच्या तपासणीसाठी तब्बल १९०० पथके गठित करण्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिले आहेत. १५ जुलै ते ३१ जुलै या १५ दिवसांच्या कालावधीत ही तपासणी केली जाणार आहे.



तपासणीसाठी शाळांची निवड


राज्यातील एक लाख ८ हजार ५३० शाळांनी स्कॉफ श्रेणीसाठी स्वमूल्यांकनात माहिती भरली आहे. त्यातील ५ टक्के म्हणजेच ५ हजार ४२७ शाळांची आता प्रत्यक्ष तपासणी करण्याचे नियोजन 'एससीईआरटी'ने केले आहे. या साडेपाच हजार तालुकानिहाय शाळा राज्यस्तरावरून निवडण्यात आल्या असून तपासणीला जाणाऱ्या पथकांना संबंधित शाळेचे नाव तीन दिवस आधी कळविले जाणार आहे.



सहा शाळांचे 'टार्गेट'


प्रत्येक पथकात चार कर्मचारी असतील. त्यात गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रामुख अशा कर्मचाऱ्यांचा समावेश राहील.उ एका पथकाला सहा शाळा तपासणीचे 'टार्गेट' राहणार आहे. शाळांनी स्वमूल्यांकनात दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष तपासणीत आढळलेल्या माहितीत तफावत आढळल्यास वरिष्ठांना कळविण्याचे निर्देश आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)