वृक्षारोपण आणि संवर्धन लोकचळवळ व्हावी !

शालेयवृत्त सेवा
0

 




वृक्षारोपण आणि संवर्धन लोकचळवळ व्हावी !

          ग्लोबल वार्मिंगचा संभाव्य धोका टाळण्यासाठी वृक्ष लागवड, संगोपन, संवर्धनाने पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे. वृक्ष लागवडीने वनक्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने शासन स्तरावरून अभियान राबवत असले तरी जोपर्यंत वृक्षारोपन आणि संवर्धनाची लोकचळवळ होणार नाही तोपर्यंत हे अभियान यशस्वी होणार नाही. शासन सांगते म्हणून आपण करणे यापेक्षा वृक्ष नसेल तर त्याचे किती वाईट परिणाम होतील किंवा होत आहे हे जर प्रत्येकास समजले तर नक्कीच वृक्षारोपन आणि संवर्धन ही लोकचळवळ होईल. 


      "आरमारास तख्ते, सोट डोलाच्या काठया आदीसाठी लाकूड असावे लागते, ते आपले राज्यात अरण्यामध्ये सागवान आदी वृक्षे आहेत, त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजुर लेहून हुजरच्या परवानगीने तोडून न्यावे. या विरहीत जे लागेल ते परमुलकीहून खरेदी करूनआणावी. स्वराज्यातील आंबे, फणस आदी करून हेही लाकडे आरमाराचे प्रयोजनाची परंतु त्यास हात लाऊ न द्यावा. काये म्हणोन की ही झाडे वर्षा दो वर्षानी होतात ऐसे नाही. रयतेने ही झाडे लाऊन लेकरासारखी बहुतकाळ जतन करून वाढविली. ती झाडे तोडलियावरी त्यांचे दुःखास पारावार काये? एकास दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारास हीत स्वल्पकाळेच बुडोन नाहिसेच होते. किंबहूना धन्याचेच पदरी प्रजापीडणाचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावे हानीही होते. याकरिता हे गोष्ट सर्वथा होऊ न कदाचित एखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याच्या संतोषे त्यावे. बलात्कार सर्वथा न करावा. "


       दूरदृष्टीचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे आज्ञापत्र वृक्षारोपन काळाची गरज असल्याचे सांगते. छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले त्या काळात तर वनसंपदा महाराष्ट्रात अमाप होती. डोंगर, दऱ्या, घनदाट जंगल, नद्या हेच महाराजांच्या स्वराज्य उभारणीस मोलाचे ठरले. ऐवढे जंगल असतानाही महाराजांना वृक्षारोपन, वृक्षसंरक्षणासाठी स्वंतत्र आज्ञापत्र काढतात, म्हणजे रयतेला जागरूक करण्यासाठी त्यांची दूरदृष्टी आजही किती उपयुक्त ठरते.


        वनसंपदा मानवास किती लाभदायक आहे, त्याचा वापर कसा करावा, त्याची काळजी कसी घ्यावी हे महाराजांनी सोळाव्या शतकातच आज्ञापत्राने पटवून दिले. अशा लोकराज्याच्या विचारांचे स्मरण आज आवर्जुन होते. फार पूर्वी घनदाट अरण्ये होती. सूर्याची किरणेसुध्दा जमिनीवर पोहोचत नसत एवढी दाट, पण माणसाने आपल्या हव्यासापोटी काय केले. प्रथम जीवनाची निकडीची गरज म्हणून निवाऱ्यासाठी, नतंर सरपणासाठी आणि नतंर आपल्या स्वार्थासाठी हळूहळू जंगले उजाड केली. त्यामुळे पृथ्वीचा समतोल बिघडला आणि पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण झाल्या. अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ, पाणीटंचाई अशा जीवघेण्या समस्या निर्माण झाल्या. याला जबाबदार कोण? शहरीकरणाच्या नावाने जंगल तोडून सिमेंटचे जंगले उभे राहिले. दळवळणासाठी रस्ते तयार झालीत, मोठे मोठे झाडे तोडून मोठ मोठ रस्ते तयार झाले. रस्त्याच्या दुतर्फा लावलेले झाडे आता दिसेनासे झाले. झाडे लावावे दुसऱ्यांनी आणि त्याचा आसरा घ्यायचा आपण असेच सर्वानी ठरवले तर कसे होईल?


भारतीय वन सर्वेक्षण संस्थेच्या नोंदीनुसार

         २००९ ते २०११ या कालावधीत देशात एकंदर ३६७ चौरस किमी जंगलाचा नाश झाला आहे. भारतातील नैसर्गिक जंगले दरवर्षी १.५ ते २.७ टक्के या वेगाने घटत चालली आहेत. अशाप्रकारे एका बाजूला आपण प्रदूषण वाढवत आहोत तर दुसऱ्या बाजूला प्रदूषण रोखणारी वने नष्ट करीत आहोत. याचे गंभीर परिणामही आता दिसू लागले आहेत. सन २००० पासून जगभरात प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. त्यापैकी साठ टक्केच्यावर मृत्यू आशियात होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात दरवषी ३.२ दशलक्ष मृत्यू प्रदूषणाशी निगडीत आजारांनी होत आहे.


         वृक्षांचे फायदे अनेक आहेत हेही मानव विसरला की काय असे वाटते. औषधी वनस्पती, फळे, फुले, इंधन, फर्निचर, बांधकामास उपयोगी तर आहेत पण मानवास जगण्यासाठी लागणारा प्राणवायू सुद्धा मिळतोय. शुध्द ऑक्सिजन मिळण्यासाठी तरी झाड लावूया, त्याला जगऊ या! पर्यावरण संतुलित राहण्यासाठी हे अत्यावश्यक आहे ही जाणीव होणे गरजेचे आहे.


        शालेय जीवनापासूनच वृक्षारोपन आणि संवर्धनाचे महत्त्व समजायला हवे. शाळा स्तरावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हावी, होतही आहे पण पाण्याच्या समस्येमुळे, दिवाळी व उन्हाळी सुट्टयांमुळे वृक्षांची देखभाल होत नाही. यामुळे ती वाळतात, नष्ट होतांना दिसतात. अशावेळी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. दरवर्षी शासनस्तरावर कोट्यवधी वृक्षांचे रोपन होते पण किती टक्के त्याचे संवर्धन होते? वृक्ष लावतांना त्याची मोजमाप होते पण तीच लावलेले वृक्ष किती प्रमाणात जगली, याचा थांगपत्ता लागत नाही. रस्त्याच्या दुर्तफा झाडे लावून ती जगवली पाहिजे. ही सर्वाचीच जबाबदारी आहे.


         आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार भौगोलिक क्षेत्रामध्ये ३३ टक्के वृक्षाच्छादन आवश्यक आहे. या तुलनेत राज्यात वृक्ष अवरणाचे प्रमाण २० टक्के एवढे आहे. त्यामुळे पर्यावरणाचे असंतुलन, असमतोल, वाढते प्रदूषण अशा गंभीर बदलांना सामोरे जाव लागत आहे. या बाबीची तीव्रता व परिणामकारकता कमी करण्यासाठी शासनस्तरावरून गेल्या तीन वषार्पासून वृक्षलागवड अभियान राबविण्यात येत आहे. शासनाच्या हाकेला ओ देऊन हे अभियान यशस्वी करण्यासाठी वनमहोत्स्व साजरा करूया! संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सुमारे चारसे वर्षांपूर्वी उगीच लिहून ठेवले नाही, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. !












-यादवपुत्र रमेश मुनेश्वर

 संवाद :  ७५८८४२४७३५

(लेखक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत. )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)