शाळा हे समाजाचे प्रतिबिंब

शालेयवृत्त सेवा
0

 



शाळा हे समाजाचे प्रतिबिंब


शाळा म्हणजे केवळ चार भिंतींचे इमारत नव्हे, तर ती समाजाचे लघुरूप असते.

विद्यार्थ्यांचे घडणे, संस्कार होणे, ज्ञान मिळणे आणि जीवनमूल्यांचा अंगीकार होणे हे सर्व शाळेतूनच घडते.


शाळा हे समाजाचे प्रतिबिंब आहे कारण –


समाजातील संस्कृती, परंपरा आणि मूल्ये शाळेत उमटतात.


समाजातील चांगले–वाईट गुण विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतात.


शाळा ही समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणते.



विद्यार्थी समाजात कसे वागतील, कसे विचार करतील, कसे निर्णय घेतील हे सर्व शाळेत घडते.

समाजाला जसे सुशिक्षित, सजग आणि सुसंस्कृत व्यक्ती हवे असतात तसे घडविण्याचे कार्य शाळा करते.


शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक असतात.

शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर त्यांना प्रामाणिकपणा, शिस्त, कर्तव्य, सहकार्य आणि मानवी मूल्यांची शिकवण देतात.

समाजात जे गुण अपेक्षित आहेत तेच गुण शाळेत जोपासले जातात.


शाळेत विविध सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते.

त्यातून समाजातील ऐक्य, एकजूट, विविधतेतील एकता यांचे दर्शन घडते.

समाजात सर्व धर्म, जात, भाषा यांचे लोक राहतात तसेच शाळेतही विद्यार्थी एकत्र राहतात.

यातून परस्पर सहकार्य, बंधुता आणि प्रेम निर्माण होते.


शाळा ही समाजातील समस्या समजून घेते आणि त्यांचे निराकरण करण्याचा मार्ग दाखवते.

उदा. स्वच्छता मोहिम, पर्यावरण संवर्धन, पाणी बचत, अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या उपक्रमांद्वारे शाळा समाजाला जागरूक करते.


समाज जसा प्रगतीकडे जातो तशी शाळाही बदलते.

नवीन तंत्रज्ञान, संगणक, विज्ञान प्रयोग, क्रीडा, कला, संगीत अशा क्षेत्रांत शाळा विद्यार्थ्यांना घडवते.

त्यातून समाजात प्रगतीशील पिढी निर्माण होते.


शाळेत विद्यार्थी लोकशाही मूल्यांचा अंगीकार करतात.

निवडणुका, प्रतिनिधी, विद्यार्थी परिषद यांच्या माध्यमातून समाजातील लोकशाही व्यवहार शिकवला जातो.

त्यामुळे ते मोठे झाल्यावर जबाबदार नागरिक होतात.


शाळा म्हणजे प्रेम, शिस्त, सहकार्य, प्रामाणिकपणा, निसर्गप्रेम, देशभक्ती यांचे केंद्र असते.

समाज जसा अपेक्षा ठेवतो तसा आरसा शाळा दाखवते.

विद्यार्थी म्हणजे समाजाचे भवितव्य.

हे भवितव्य कसे घडेल याचे प्रतिबिंब शाळेत दिसते.


आजच्या काळात शाळा समाजाशी अधिक घट्टपणे जोडल्या जात आहेत.

पालकसभा, ग्रामसभा, सामाजिक उपक्रम यातून शाळा आणि समाज एकमेकांना पूरक ठरतात.

शाळा केवळ पुस्तकापुरती मर्यादित राहत नाही तर जीवनाशी निगडित धडे देते.


समाजातील ज्या मूल्यांमुळे राष्ट्र प्रगत होते ते सर्व मूल्ये शाळेतून रुजतात.

शाळा नसती तर समाज अंध:कारमय झाला असता.

शाळेतील संस्कारांमुळे समाज प्रकाशमान होतो.


निष्कर्ष:

शाळा म्हणजे समाजाचा आरसा आहे.

विद्यार्थ्यांमध्ये दिसणारे गुण हे समाजाचेच प्रतिबिंब आहे.

म्हणून शाळा आणि समाज हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत.

समाज जसा असेल तशी शाळा, आणि शाळा जशी असेल तसा समाज.

म्हणूनच योग्य समाज निर्मितीसाठी चांगल्या शाळांची गरज असते.


                                                                           लेखक :- श्री.जगधने नामदेव विठ्ठलराव

                                                                       उपशिक्षक

                                                                                म.न.पा.शाळा.उंड्री,पुणे ४११०६०

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)