पायाभूत चाचणी अंतर्गत हरणमाळ जि.प. शाळेला डायट संस्थेचे अधिव्याखाता प्रदीप पाटील यांची भेट

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थ्यांसह खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार बुधवार ६ ऑगस्टपासून शुक्रवार ८ ऑगस्टपर्यंत दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची पायाभूत मूल्यमापन चाचणी घेण्यात येत आहे. 


नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणमाळ येथे पायाभूत चाचणी अंतर्गत परीक्षेला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथील अधिव्याख्याता प्रदीप पाटील, धडगाव तालुका गटशिक्षणाधिकारी डी.डी. राजपूत, शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र बागले, श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांनी अचानक भेट दिली. यावेळी डायट संस्थेचे अधिव्याख्याता  प्रदीप पाटील, गटशिक्षणाधिकारी डी.डी.राजपूत, शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र बागले, केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांचा शाल, रोप देऊन सत्कार प्रशालेतील उपक्रमशील शिक्षक गोपाल गावीत यांच्या हस्ते करण्यात आला. डायट अधिव्याखाता प्रदीप पाटील यांनी प्रत्यक्ष परिक्षा वर्गास समक्ष भेट देवून शाळेत चाललेल्या पायाभूत चाचणी परीक्षेची पाहणी करीत स्वतः खडू हातात घेवून विद्यार्थ्यांना शिकवण दिली. भौतिक सुविधा व विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी देण्यात आलेल्या उपक्रमांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. मुख्याध्यापिका छोटी पाटील यांनी शाळेच्या कामकाजाविषयी माहिती दिली.


     यावेळी श्रावणी केंद्रप्रमुख श्री. निंबा पाकळे, उपक्रमशील शिक्षक गोपाल गावीत, विद्यार्थी उपस्थित होते. अध्ययन निष्पत्ती निश्चित करण्यासाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्या हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. जिल्ह्यातील उच्च प्राथमिक शाळांमधील जवळपास निम्मे विद्यार्थी या उपक्रमापासून वंचित राहिल्यास संपादन पातळीत वाढ करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसेल, ही वस्तुस्थिती विचारात घेऊन खासगी अनुदानित शाळांमधील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी एक आणि दोन या चाचण्या दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्याची राज्य पुरस्कृत योजना २०११ पासून सुरू आहे. त्यामुळे 'एससीईआरटी'च्या संचालकांच्या प्रस्तावानुसार खासगी अनुदानित शाळांमधील दुसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना संकलित मूल्यमापन चाचणीच्या प्रश्नपत्रिकांचा राज्यस्तरावरून पुरवठा करण्यात आला आहे. असेही जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता प्रदीप पाटील यांनी मत व्यक्त केले आहे. 


दरम्यान, यापुढे राज्यातील वाडी, वस्ती, पाड्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचाविण्यासाठी दरमहा पायाभूत चाचणी घेवून, बौधिक स्तर वाढविण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जातील. राज्यातील या अभिनव संकल्पनेचे शिक्षक गोपाल गावीत जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार यांनी देखील कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)