छत्रपती संभाजीनगर येथील सरला कामे या शिक्षिकेने बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली. त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारासह अनेक सन्मान मिळाले.
छत्रपती संभाजीनगर ( शालेय वृत्तसेवा ) :
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. मात्र, या योजनांना यशस्वी करण्यामध्ये शाळेतील शिक्षकांची भूमिका देखील महत्त्वाची ठरते. अशीच एक नाविन्यपूर्ण पद्धत वापरत सिल्लोड येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका 'सरला कामे' यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढवण्याचा अनोखा प्रयोग केलाय.
बोलक्या बाहुल्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना मिळतात धडे :
सरला कामे यांनी बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढवली. शिवाय वेगवगेळ्या ठिकाणी कार्यक्रम सादर करत सामाजिक प्रश्नांकडं लक्ष केंद्रीत करण्याचं काम केलंय. स्वतः तयार केलेल्या बाहुल्यांच्या मदतीने त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे धडे देतात. या बाहुल्या स्थानिक बोलीभाषेतून संवाद साधत असल्यानं मुलांना अभ्यासात अधिक रस वाटतो. यामुळं अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात परत आले आहेत. त्यांच्या या नाविन्यपूर्ण प्रयोगाबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक सन्मान मिळाले असून राज्य सरकारने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवले आहे. तर अनेक संस्थानी देखील त्यांना पुरस्कार देऊन गौरवले आहे.
बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून शिक्षणाची गोडी :
काळ जसा पुढे जातोय तशा शिक्षणाच्या पद्धतीत मोठा बदल देखील झाला आहे. अत्याधुनिक पद्धतीने खासगी शाळा शिक्षण देताना दिसत आहेत. मात्र ग्रामीण भागातील गरीब मुलांना आजही त्याच पारंपरिक पद्धतीनं शिक्षण दिलं जातं. अनेक मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लावण्यात आजही अडचणी निर्माण होत आहेत. मात्र सिल्लोड येथील जिल्हापरिषद शाळेतील सरला कामे या शिक्षिकेने अनोखी पद्धत वापरून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. सरला कामे या बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देतात. त्यांनी स्वतःच विविध बाहुल्या तयार केल्या आहेत. परिसरातील बोली भाषांचा वापर करून, त्यांना आवडेल तश्या बाहुलीचा वापर करून शालेय अभ्यासक्र आणि विविध विषयांचे त्या शिक्षण देतात. त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळं त्यांची शिक्षण पद्धती राज्यात पसंतीस उतरत आहे.
सरला कामे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार :
सरला कामे या जिल्हापरिषद शाळेतील शिक्षिका असून त्यांनी त्यांनी तीस वर्षांची सेवा पूर्ण केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत असताना काही अडचणी त्यांच्या लक्षात आल्या. 2009 मध्ये घरीच मुलांसोबत खेळताना त्यांनी एक बाहुली तयार केली आणि त्या खेळू लागल्या. त्यावेळी मुलांना आलेली मजा लक्षात घेता, जिल्हापरिषद शाळेतील मुलांना जर याच माध्यमातून शिक्षण दिलं तर त्यांना आवडेल असं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळं त्यांनी घरीच बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून कसं शिकवता येईल याबाबत अभ्यास सुरू केला. त्यांनी वेगवेगळ्या बाहुल्या तयार करत मुलांना नाविन्यपूर्ण शिक्षण दिलं. परिणामी अनेक मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत झाली. 2016 मध्ये त्यांना त्यांच्या या उपक्रमाबाबत आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तर केंद्र सरकारचा भारत निर्माण अभियान अंतर्गत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. आतापर्यंत जवळपास 71 पुरस्कार त्यांना देण्यात आले आहेत. नाविन्यपूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढवण्यासाठी प्रयत्न केल्याची माहिती सरला कामे यांनी दिली.
विविध सामाजिक उपक्रमात सहभाग :
बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत असताना वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर सरला कामे यांनी काम सुरू केलं. स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह, बेटी पढाओ बेटी बचाओ यासारख्या उपक्रमात राज्यातील जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन त्यांनी उपक्रम घेत जनजागृती केली. राज्य सरकारनं जिल्हाधिकारी यांच्यामार्फत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदार जनजागृती करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. 2018 मध्ये अमेरिकेतील सामाजिक संस्थानी त्यांच्या कार्याची दखल घेत निमंत्रित केलं होतं. मात्र, नंतर काही कारणामुळं त्यांना सोहळ्यास जाणं शक्य झालं नव्हतं. मात्र ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या कार्याबद्दल कौतुक नोंदवण्यात आल्याची माहिती सरला कामे यांनी दिली.
विद्यार्थ्यांमध्ये झाली गोडी निर्माण :
सरला कामे यांच्या बोलक्या बाहुल्यांचा प्रयोग अनेक ठिकाणी कौतुकाचा विषय झाला आहे. सध्या त्या सिल्लोड येथील जिल्हापरिषद शाळेत सक्रिय आहेत. शाळेतील विद्यार्थी देखील कामे मॅडम यांच्यासारखे बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधून शिक्षण घेत आहेत. नाविन्यपूर्ण प्रयोगामुळं अभ्यासातील गोडी वाढली आहे. शिवाय विविध उपक्रमांची माहिती मिळत असल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .