पुणे येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. साईनाथ पाचारणे यांनी माझ्या "काव्यांजली" या काव्यसंग्रहाचे केलेले समिक्षण

शालेयवृत्त सेवा
0

 



        ' पी एम श्री समग्र शिक्षा ' अंतर्गत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे , यांच्यावतीने इयत्ता सहावी ते आठवी या स्तरासाठी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील कवी श्री अरविंद थगनारे यांचा ' काव्यांजली '  हा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. या संग्रहात एकूण 15 कविता आहेत.


           आपल्या मनोगतात ते म्हणतात की,

"  विद्यार्थ्यांच्या मनात विविध कल्पना येतात या कल्पनांचा धागा धरून त्यांच्या भावविश्वाशी संबंधित कविता लिहिण्याचा माझा मानस होता. त्यांचे कल्पना विश्व समृद्ध व्हावे व त्यांच्यावर सुसंस्कार व्हावे अशी माझी या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून अपेक्षा आहे."


    या काव्यसंग्रहाला त्यांनी स्वतः चित्रे रेखाटली आहेत. आणि ही चित्रे कवीने स्वतः आशयानुकूल तयार केली आहेत. अरविंद थगनारे स्वतः शिक्षक आहेत. मुलांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे मुलांसाठी लिहिलेला आशय आणि मुलांच्या मनातील चित्राशय जुळून आला आहे.


       त्यांनी कवितासंग्रहाला ' काव्यांजली ' असे नाव दिले आहे. काव्य आणि अंजूली असा या शब्दाचा समास आहे. अंजूली म्हणजे ओंजळ ! काव्य फुलांची ही ओंजळ कवीने बालवाचकांसाठी रीती केली आहे. मुलांच्या वयोगटाला अनुसरून आशय, विषय ,आणि भाषा यांचा वापर केल्याने त्यांच्या कवितेत एक गोडवा पसरला आहे.

' बालमन आणि बालसाहित्य' या अनुराधा पाठक यांच्या ग्रंथाच्या मलपृष्ठावर त्या म्हणतात की,

 " वाचनाची प्रक्रिया प्रामुख्याने डोळ्यावाटे चालते. डोळ्याला शक्ती देते मन. मनाला शक्ती देते बुद्धी. आणि बुद्धीला शक्ती मिळते सुसंस्काराची !  या सर्वांची सांगड बाल साहित्यात घातली जाते."


      अरविंद  थगनारे यांच्या बाल कवितांमध्ये या सगळ्याचा उत्तम मेळ घातला गेला आहे. काव्य लिहिताना त्यांचे मन बाल होते. प्रगल्भ बुद्धीच्या मुलांना हे बालसाहित्य आपलेसे वाटते.

        ' सैनिका मी स्वागत करतो ' या देशभक्तीपर कवितेतून त्यांनी सीमेवर रमणाऱ्या आणि भूमातेची रक्षा करणाऱ्या सैनिकाचा गौरव केला आहे. 


सीमेवरती मन तुझे ते 

युद्धामध्ये रमले 

कणखर काटक तुझे 

शरीर रक्ताने रंगले


या ओळीतून सीमेवरील सैनिकांचे वास्तव त्यांनी मुलांना करून दिले आहे. हे भारत मातेचे सैनिक जीवनांत होईपर्यंत भूमातेची रक्षा करतात.

  तर ' मन ' या कवितेत त्यांनी चंचल मनाच्या भावछटांचे लुकलुकते तारांगण मुलांना उलगडून दाखवले आहे. ते म्हणतात,


मन आपले बहुरंगी पृष्ठांचे पुस्तक

वाचता वाचता सुन्न होते आपले मस्तक


' ये गं ये गं चिमणी बाई ' या कवितेतून ते एका सासुरवाशीनीची चिमणीवरची माया व्यक्त करतात. तिला आपल्या जवळ बोलावतात. आपल्या माहेरी जायला सांगतात. माहेरी जाऊन आपली खुशाली आई-बाबांना सांग असे म्हणतात. चिमणीला आपल्या माहेरचे वर्णन करून सांगतात. या कवितेतून एका सासुरवासिनीची माहेराविषयी ओढ ते व्यक्त करतात.


 ' श्रावण मास ' या दीर्घकवितेतून त्यांनी श्रावण महिन्याचे वर्णन केले आहे .

मासात श्रेष्ठ 

श्रावण मास 

हिरवाईने 

नटला खास 


मध्येच येती 

या जलधारा 

पिंगा घाली 

खट्याळ वारा


नाचणारा मोर, हरणांचा कळप, गडगडाटी मेघ,आणि सुंदर इंद्रधनुष्य, असे मनोहर दृश्य या कवितेतून पाहायला मिळते.

      या संग्रहात रंगोत्सव, दिवाळी या भारतीय सणांवर त्यांनी कविता केल्या आहेत . दिवाळी सणात उडवल्या जाणाऱ्या बारूद, अग्निबाण, भुईचक्र, टिकली, सर्प गोळी ,सुतळी बॉम्ब, फटाकडी, अशा वेगवेगळ्या फटाकड्यांचे वर्णन आले आहे. पण शेवटी कवी म्हणतो की,


यावर्षी मात्र 

ठरवले आम्ही 

दिवाळीच्या खरेदीतून 

फटाके करायचे कमी


आरोग्य आणि प्रदूषण यांचा नकळत उपदेश करणारी आणि सल्ला देणारी ही कविता उत्तम जमली आहे. अभंग या कवितेतून संत तुकारामाचे चरित्र दीर्घ कडव्यांमधून त्यांनी उलगडून दाखविले आहे. महान संत तुकाराम महाराज यांची मुलांना ओळख करून दिली आहे.

       ' जगाचा पोशिंदा ' ही शेतकऱ्यांच्या जीवनावरील कविता म्हणजे शेतकऱ्यांची व्यथा मांडून डोळ्यात पाणी आणणारी आहे .तर ' वसुंधरा 'या कवितेत त्यांनी वसुंधरेची कथा मांडली आहे.


 वसुंधरे ग वसुंधरे सांग सांग तुझी कथा 

वृक्षवल्लरी 

तरुवर सारे 

तुझेच अमृत 

पिती बिचारे 


असे म्हणून त्यांनी वसुंधरेचे उपकार, महती ,थोरवी, सांगितली आहे. अहिल्याबाई होळकर आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक यांच्यावरील दीर्घ कविता मुलांसाठी कशा वाचनीय होईल याचीही काळजी त्यांनी घेतली आहे.


अरविंद थगनारे यांच्या ' काव्यांजली ' या कवितासंग्रहातील कवितांचे विषय वेगवेगळे आहेत. समग्र शिक्षा अंतर्गत  ज्या वयोगटातील मुलांसाठी हे साहित्य निवडले आहे ते अतिशय योग्य आहे. मुलांच्या मनातील भावसृष्टीचा त्यांनी साकल्याने शोध घेतला आहे. सांस्कृतिक,सामाजिक, नैसर्गिक , अशा वेगवेगळ्या आयामाचा त्यांनी आपल्या कवितेतून शोध घेतला आहे. मुलांच्या भावविश्वाचा सौंदर्यपूर्ण अनुभव आपल्या कवितेत उतरविला आहे.


     त्यांच्या कवितेतून शब्दांची नादानुसारी वलय आणि त्याची पुनरावृत्ती यांची नेमकीपणाने सांगड घालून विविध विषयांचा सुंदर अनुबंध कवितेतून जोडला आहे. सांस्कृतिक वातावरणाने मुलांच्या मनाला आकार मिळतो. याची जाणीव ठेवून त्यांनी वेगवेगळी मूल्य आपल्या कवितेतून निर्धारित केली आहे. ही मूल्य कशी रुजवता येईल आणि मुलांच्या निर्मळ मनाचा विकास कसा घडेल याची मूल्यधारणा त्यांना अवगत असल्यामुळे त्यांच्या कवितेतील साहित्याचे मूल्यद्रव कवितेतून सहज विकसित झाले आहे.


        - प्रा. साईनाथ पाचारणे

                     पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)