'गाव विकणे आहे' हा कथासंग्रह जीवनानुभूतीचा अविष्कार.. The village is for sale

शालेयवृत्त सेवा
0

 


          

        'गाव विकणे आहे' हा डाॅ.राज यावलीकर ,अमरावती यांचा कथासंग्रह नुकताच हाती पडला. विविध विषय आशय व कथानक घेऊन आलेल्या एकूण पंचेवीस कथा यामध्ये आहेत. सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ.राज यावलीकरांनी आजपर्यत भरपूर पुस्तके लिहिली आहेत. कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबरी, एकांकिका, बालकाव्य, व्यक्तिविशेष, शिल्पकला, बोधकथा, इत्यादी. काही महत्वाचे पुरस्कारही त्यांच्या नावावर आहेत. 


       'गाव विकणे आहे' हा अनोखा कथासंग्रह. यातील पहिलीच कथा 'गाव विकणे आहे' . अलिकडे राजकारण्यांच्या निर्थक आश्वासनांना कंटाळून  'अंधारवस्ती' गावातील गावकरी गाव विकण्याचा निर्णय घेतात. तसा बोर्ड गावाच्या बाहेर लावण्यात येतो.निवडणूक काळात राजकारण्यांना गावात येण्याची बंदी घालतात. याच गावातील रहिवासी बाळासाहेब आमदार होऊन मंत्री होतो. मात्र गावाचा विकास न केल्यामुळे गावकरी नाराज असतात. गावचा सरपंच भिमा हा बाळासाहेबाचा बालपणीचा मीत्र. तो गावात आल्यावर दगाफटका होऊन नये म्हणून त्याला गावात येण्यापासून रोखण्यासाठी भिमाच वेशीबाहेर त्याला अडवितो आणि गावच्या परिस्थितीविषयी नाराजी व्यक्त करून त्याला परत पाठवितो. ही कथा वास्तवावर आधारीत असल्याची जाणीव होते. वास्तवामध्ये लोकांनी अशी कितीतरी गावे विकायला काढली होती.मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ‌कठोर निर्णय घेऊन राज्यकर्त्यांना वठणीवर आणण्याचा हा शेवटचा उपाय करतात. लेखकाने गावाचं भिषण वास्तव मांडलेलं आहे. परंतु राज्यकर्त्यांना त्याचं सोयरसुतक नसतं.याची खंत वाटते .दुसरी कथा ‌'नदीकाठची माणसं'. या कथेमध्ये  आपल्या प्रवाशांप्रती प्रमाणीक असलेला म्हातारा नावाडी लेखकाने  उभा केलेला दिसतो. महापुराच्या प्रसंगी स्वत:च्या पत्नीला नावेसह पुरात वाहत जाऊ देतो पण एका प्रवाशी मुलाला मात्र वाचवितो. यातून नावाड्याचा प्रामाणीकपणा, उदार अंत:करणाचा व माणुसकी असलेला माणूस आपयाला भेटतो. 'बुजगावणं' ही काहिशी विनोदी अंगाची पण कष्टाप्रतीची प्रामाणीकता दर्शविणारी कथा. तसेच 'राजकारण गेलं चुलीत' ही वास्तवावर आधारीत कथा आहे. राजकारणी लोक नेत्याच्या सभेला गर्दी असावी म्हणून मजूर लोकांना रोजाचे पैसे देऊन सभेला नेतात. सभा संपली की त्यांचेकडे दुर्लक्ष करणा-याच्या घटनेवर लेखकाने विनोदाच्या अंगाने छान प्रकाश टाकला आहे. 'जंगलची पाखरं' ही हृदयस्पर्शी कथा. रामा नावाच्या फासेपारधी याच्यातील माणुसकी जीवंत करण्याचा हा प्रसंग आहे. ही कथा वाचकांच्या मनाला चटका लावून जाणारी आहे. पारधी शिकार करतांना त्याला जाळ्यात अडकून सापडलेल्या भोवरीच्या छोट्याशा पिलाची हृदयस्पर्शी कथा आहे. यातून जंगलातील मुक्या पशू पक्षांना जीवनदान दिले पाहिजे,त्यांचे रक्षण केले पाहिजे. हा संदेश देणारी कथा लेखकांनी छान साकारली.


       सर्वच कथातील पात्र, कथानक, घटना, प्रसंग, वेळ, काळ, भाषाशैली, सुंदर अशी निवेदन शैली यांचा खुबीने उपयोग करून लेखाकाने या कथा  कलात्मकरीत्या साकारल्या आहेत. यातील  व-हाडी बोलीतील संवादही वाचक मनाला भावतात. त्यामुळे कथेत गोडवा निर्माण झाला आहे.इंग्रजी व बोली भाषेतील शब्दांच्या उपयोजनाने कथेची उंची वाढली आहे. अवतीभोवतीच्या विविध घटनांचं प्रतिबिंब या कथांमध्ये दिसते. लेखकाचे अवलोकन, वाचन,अनुभव,चिंतन, मनन,डोळस जाणीवा यामध्ये दिसतात. कुठेही फारशी अतिशयोक्ती नाही. वास्तव विषयाला धरून या कथा कथाकाराने साकारलेल्या आहेत. 'छत नसलेली शाळा' ही कथा आदिवासी भागातील शिक्षणाची दुरावस्था या विषयाला अनुसरून आहे. कोठून तरी एक सभ्य गृहस्त एका गावात येतो. आणि तेथे बिन छताच्या एका खोलीत मुलांना व प्रौढांना विनामूल्य शिकविण्याचं कार्य करतो. यातून त्या गावाची मुलं शिकून मोठ्या हुद्दयावर जातात आणि शिक्षणाचं नंदनवन फुलवितो. ही कथा प्रेरणादायी आहे. 


अजूनही अशा शाळा जंगलातील आदिवासी दुर्गम असलेल्या काही पाळ्यावर ,गावात चालतात. ही शोकांतीका आहे. 'कचरेवाला' या कथेचा नायक सुशिक्षीत बेकार असलेला कलीम कचरेवाला आणि गुडीया यांचं संवादातून निर्माण झालेलं जिव्हाळ्याचं नातं अधोरेखीत होते.परंतु कलीमचा अपघात होतो अन गुडीयाच्या बाहुलीला कपडे देण्याचे स्वप्न अपूर्णच राहून जाते.ही भावस्पर्शी कथा मनाला चटका लावून जाणारी आहे. 'मालटेकडीच्या पायथ्याशी' ही एका अनाथ अंबादास व मोठ्या हृदयाचा अब्बु नावाच्या फकीराची ही कथा आहे. यात व्यायामाचे महत्व ,माणुसकी, कामाप्रतीचा प्रामाणीपणा आणि मैत्रीचे खरे नाते उजागर होते. 'दगड' ही अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करणा-या उद्योगपतीची पण तरीही अंधश्रद्धेला बळी पडलेल्या गावक-यांची कथा आहे. 'गुरूशिष्य' ही कथा भाटी नावाच्या गुरूप्रती अमोल नावाच्या शिष्याच्या मनात असलेल्या आदराच्या भावनेची ही हृदयस्पर्शी अशी कथा. शिक्षकाची नोकरी गेल्याने नाईलाजाने त्या शिक्षकाला हात रीक्षा चालवावा लागतो पण प्रवाशी म्हणून बसलेला शिष्य अमोल त्यांना ओळखतो आणि आपल्या शाळेत प्राचार्यपदाची नोकरी देऊन,त्यांचा गेलेला सन्मान पुन्हा मिळवून देतो.विद्यार्थी असावा तर अमोलसारखा.हे सांगणारी कथा काळजात घर करून जाते. 'नशीब' ही नशीब व अब्दुलच्या प्रामाणीकपणाची भावस्पर्शी कथा  आहे. गरीब लोकांच्या मनात प्रामाणीकपणा अजूनही जीवंत आहे. याचेच हे उदाहरण. 'शिक्षणने मला काय दिले' ही प्रेरणादायी कथा आहे. 'Education Never End' हे पुस्तक एका हाॅटेलमध्ये वेटरचे काम करणा-या एका मुलाचे आयुष्य बदलून टाकणारी कथा आहे. 'प्रेमाचे प्रतीक' ही एका भिक मागणा-या माणसाच्या मनात आपल्या पत्नीविषयी असलेला आदर व निस्सीम प्रेमाची ताजमहलजवळील कथा आहे.


      या कथासंग्रहातील एकूण पंचेवीस कथांपैकी साधारणत: सहा कथा या वेगवेगळ्या आशयाच्या अंगाने शिक्षण या विषयाशी संबंधीत आहेत.तर तीन कथा या कुशल व अकुशल कर्मावर आधारीत आहेत. 'प्रेमाचे प्रतीक' व 'प्रेमगाठ' या दोन कथा पती-पत्नीच्या प्रेमावर आधारीत आहेत. 'गाव विकणे आहे' व 'राजकारण गेलं चुलीत ' या दोन कथा राजकारणावर आधारीत आहेत.इतर कथा भ्रष्टाचार, विकास, पर्यावरणाचे रक्षण, व्यक्ती स्वभावातील गुण-दोष, प्रामाणीकपणा, माणुसकी ,अंधश्रद्धा दूर करणारी. अशा विविध विषयावरील आहेत. यातील बहुतांश ट्रेनमधील मुख्य पात्र हे वयोवृद्ध,वयस्कर असल्याचे जाणवते. कदाचित लेखकांनी आपल्या वयाला अनुसरून ही पात्रं उभी केली असावीत,असे वाटते.


     'चार झाडांची बाग' ही कथा समाजासाठी प्रेरणादायी आहे. शिक्षणाचे महत्व पटवून देणारी आहे. गावोगावी फिरून डोंबा-याचा खेळ दाखविणारे भिमाचे कुटुंब संत गाडगेबाबांच्या किर्तनात शिक्षणाविषयीचा संदेश ऐकल्यामुळे प्रभावित होऊन आपल्या मुलांना शिकविण्याचा निर्णय घेतो. मुलं शिक्षित होऊन मोठ्या हुद्द्यावर नोकरीत लागतात. आणि मुलगा, मुलगी, सून,जावई ही चार झाडं शिक्षणामुळे महिण्याला कोटी रुपये उत्पन्न कशी देतात व कशी श्रीमंत झालीत? विषयीचा मोलाचा संदेश या कथेमधून लेखक देतांना दिसतात.


       डाॅ.राज यावलीकर यांच्या 'गाव विकणे आहे' या कथासंग्रहाला प्राचार्य डाॅ.रा.गो.चवरे यांची विस्तृत अशी प्रस्तावना लाभलेली आहे. डाॅ.श्रीपाल सबनीस सरांचा कथासंग्रहाची उंची वाढविणारा  अभिप्राय आहे. तर कथासंग्रहाची पाठराखण यथोचित शब्दात जेष्ठ कादंबरीकार,कथाकार,कवी,समीक्षक प्रा.बाबाराव मुसळे सरांनी केली आहे. हा कथासंग्रह संजय महल्ले यांच्या मेधा पब्लिकेशन हाऊस, अमरावती या प्रकाशन संस्थेने प्रकाशीत केला आहे. 


      एकूणच हा कथासंग्रह अंतर्बाह्य वाचनीय झाला आहे. या कथा मानवी जीवन जगत असतांना मानवाने काय करावे नि काय करू नये. याविषयीचा मोलाचा संदेश देणा-या ठरतात. कथा लेखकांनी विषय, आशयाची निवड, कथानकाची बांधनी,निवेदन शैली , बोलकी पात्र ,याबाबत काळजी घेतलेली व सतर्कता बाळगलेली दिसते. कुठेही अतिशयोक्ती नाही. जवळपास ब-याच कथा या वास्तवावर आधारीत भासाव्यात अशा कल्पकतेने साकारलेल्या आहेत. यात लेखकाची व कथासंग्रहाची यशस्वीता दिसून येते. यावलीकर सरांनी असेच सकस लिहित राहावे अशी अपेक्षा करून पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन करतो. 


-अरूण हरिभाऊ विघ्ने

मु. पो. रोहणा, जि.वर्धा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)