माणूषतेची संवेदना तेवत ठेवणारी कविता...
कवी संजय मोखडे यांचा काव्यसंग्रह हाती पडला . माणसं हरपत चाललेल्या वाटेवर... कदाचीत आपणही याच वाटेवरून चालत आहो अशी प्रतीती कविता वाचताना आल्याशिवाय राहत नाही. संघर्षविभोर समकाळ मोठाच आवाहक आहे. कवितेचे बोट पकडून आयुष्याची दुस्तर वाट चालत राहावे हा कवीचा अनोखा जुनून आहे . कविता ही जगण्याचे शहाणपण प्रसवते . तिला तत्वज्ञानाचे डोळे आहे . ती जगण्याची उमेद तेवत ठेवते. माणसं हरपत चालली, हळूहळू हे जग माणूस शून्य होत जाईल, तेव्हा डोळ्यातले अश्रू हरवलेली असेल . कोणाच्या अनाम दुःखासाठी स्पदंनार नाही हदये .. करुणाच मुकी होईल ... ही पृथ्वीच अंधारून येईल . . हळूहळू हे आंधळेपण डोळस करणारेही कुणी उरणार नाही . त्याआधी सावधतेचा वज्रनाद ही कविता व्यक्ता करीत आहे .
.
कितीतरी दुःखे या धर्तीच्या पोटात लपून आहे . ती आसवात भिजून चिंब झाली . आणि कदाचित त्याची वाफही होऊन गेली असेल . ते वाफाळलेलं दुःख कवी मनात घेऊन जगतो . ते दुःख असे भेटले, कोवळ्या वयावर कायम मुद्रित होऊन गेले . 'माय' या कवितेत कवी ते व्यक्त करतो .
आसमंताला डोळ्यात साठवून
आयुष्याच्या वाटचालीत
अनेक चढउतार
तू चढलिस/ उतरलीस
तुझ्यासारखे पापणीआड
अश्रू लपवता आले नाही
मला आजतगायत...
(माय )
हे कवी कुळाचे दुःख . जणू चिरपरिचित असल्या सारखे . संवेदनेच्या हिंदोळ्यावर थांबुन आहे . तेथून ते हयातभर हटत नाही. अशी दुःखेही माणसाला समृद्ध करणारेच असतात. आपल्या माणूसपणाचा भक्कम पाया होतात . मायेच दुःख हे आहे, की ती तिच्या दु:खाला सहजतेने प्रकट करत नाही . ती तिच्यापुरती उरली नाही . ती स्वतःच्या पलिकडे गेली आहे . जो माणूस स्वतःच्या दुःखाला ओलांडून जातो . अवैयक्तिक अस्तित्व जाणीव त्यामधून प्रकट होते . स्वपरित्यागाची धम्म जाणीव मायच्या जगण्यातून अधोरेखीत होते .डोळ्यात जे आभाळ आहे. चिल्या पिल्यांच्या भविष्याचे . त्या भविष्यासाठी ती निग्रहाने तिच्या दुःखावर मात करते . तिचा एकाकीपणा भयंकर आहे. पण माय संघर्षाने थिजत नाही . तिची जिगीशा हरत नाही . ही बाब खरेच आशान्वित करणारी आहे .
ही कविता एका सांस्कृतिक संचिताची दायाद होते . एक समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे तिला धम्म संस्कृतीचा. कवी स्वतः एक कार्यकर्तेपणाची पताका खांद्यावर घेऊन समतेच्या संगरात झोकून देणारा सैनिक आहे . सैनिकाला कशाचीच तमा नसते . जिंकू किंवा मरू हेच त्याचे ब्रिद असते. आंबेडकरी चळवळ अश्या निस्पृह दृढतेच्या बळावर उभी आहे .
आम्ही निघालो
सुनसान शहरातून
माणसं नसलेल्या वस्त्यातून
कपीलव स्तूच्या दिशेने
राजगृहाच्या वाटेने!
स्वतःचा सांस्कृतिक परिचय धुसर व्हावा असा हा काळ आहे . परंतू धम्मदीक्षेने आपल्या जीवनात नवे मूल्यांतर घडवून आणले . ही घटना आपल्या असित्वाचा बहुआयामाने मूल्यवेध घेणारी ठरली आहे . बुद्धांच्या जीवनव्यापी शोध मूल्यांना उजागर करणारी ही ओळ आहे . पण बुद्धांचा हा मार्ग आकळला जावा . यासाठी ही शोध यात्रा आहे . आपला इतिहास नव्याने पुनर्मंडीत करण्याची असोशी यामधून दिसते .
देशातील सामान्य लोकांच्या जीवनावर बौद्ध जीवन मार्गाचा प्रभाव पडला आहे . तो हजारो वर्षाच्या प्रवासात एकदम पुसल्या गेला नाही . याची साक्ष कपिलवस्तू चे अवशेष देत आहे . श्रमण संस्कृतीची पडझड झाली असली तरी जम्बुदिपातील बहुसंख्य लोक ही धम्मानुयायी होते . याची साक्ष भारतीय संस्कृती आणि अहिंसा या पुस्तकात आचार्य धम्मानंद कोसंबी देतात . आपल्या ऐतिहासिक अस्तित्वलक्षी प्रश्नाची संवेदना कवी प्रकट करतो .
हा श्रमण संस्कृतीचा मार्ग सुनसान होत चालला . समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय ही जीवनमूल्य उपरी नाही . या मातीमधली आहे . ती आयात केलेली नाही . कपिलवस्तू ही गणराज्य होती. लोकशाहीचा हा मार्ग या मातीतून प्रशस्त होत गेला . पण प्रस्थापीत मूल्य व्यवस्था हे वास्तव पुढे येऊ देत नाही . जे वास्तव युगानुयुगे झाकून होते त्या दिशेने कवी वाटचाल करत आहे . ही वाट .... विरान दिसत असली तरी एक दिवस माणसांनी बहरून येणार आहे .
नजर रोखून
जिवाच्या आकांताने
वार करणारे
धारातीर्थी पडले असताना
युद्धभूमीच्या दूर
गर्दसावलीत विसावून
यशापयशाचे आराखडे बांधण्यात व्यस्त असणाऱ्यांनो
. i
निदान
लढणाऱ्या ना च्युतिया तरी समजू नका ..::
(सिंह गर्जना )
समाज जीवनात अनेक प्रवृत्तीचा प्रत्यय येतो . आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे जे लोक असतात ते उंटावरून शेळ्या हाकत राहतात . प्रत्यक्ष समाज जीवनात काम करणारी मान्सं हे उपेक्षीत राहतात . त्यांना च्युतिया समजले जाते . हे चळवळीच्या दृष्टीने अवसान घातकी आहे .. म्हणून कवी अशा लोकांना निक्षून सांगतात . आजच्या काळात विचिकित्सेच पिक बेफाम वाढले आहे . चिकित्सा म्हणजे रोगनिवारणाची पद्धती .पण चिकित्सा जेव्हा रोग होते तेव्हा रोग मुक्ती कशी होईल? हा ज्ञानगामी प्रवास आहे . इथे कोरडा बुद्धीवाद कुचकामी ठरतो . बुद्धगामी ज्ञानप्रवास हा करुणा युक्त आहे . दोष बघायचे असेल तर स्वतःचे . गुण बघायचे असेल तर इतरांचे . पण स्वमग्नते मुळे माणसे स्वप्रशंसा आणि परनिंदा करू लागतो . त्यामुळे माणसाच्या प्रबद्ध होण्याच्या प्रक्रियेस खिळ बसते .
तूच रोहिणी
तूच चवदार तळ्याचा क्रांतदर्शी प्रवाह
तूच दिल्या युगानुयुगे
विजयाच्या ललकार्या
तू लिहिलेच पाहिजे
तू गायीलेच पाहिजे
अंधार चिरत नेणारी क्रांतीगितं!
सम्यक आशावादाची लिपी गिरवणारी ही कविता . ती माणसाच्या अंतःकरणास हात घालते . ती क्रांतीची हाक देते . मूक होत जाणारा माणूषतेस मुखीर करते . ती कॉमन मॅनचे प्रतिनिधित्व करते . समष्टिच्या जाणिवेचे उन्नयन साधते .
कवीचा हा पहिलाच काव्यसंग्रह म्हणजे दमदार एन्ट्री आहे . कवीला खूप खूप शुभेच्छा !
. -सुभाष गडलिंग (किनवट )


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .