पुणे, दि. २५: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचे नियंत्रण राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हा आयोजन व सनियंत्रण समिती कक्षाकडून अतिशय काटेकोरपणे करण्यात आले असून ‘‘टीईटी’ चा पेपर ३ लाखांत! शिक्षकांची टोळीच जेरबंद’ या आशयाच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचे आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
दैनिक लोकमत वृत्तपत्राच्या 24 नोव्हेंबर रोजीच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने परिषदेकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत गोपनीयरित्या प्रश्नसंच तयार करून तज्ञांमार्फत स्वतंत्र पाकिटात सीलबंद केले जातात. तयार केलेल्या संचांपैकी यादृच्छिकपणे प्रश्नसंच निवडून गोपनीय मुद्रणालयाकडे दिला जातो. गोपनीय मुद्रणालयामार्फत प्रश्नपत्रिका छापून वर्गखोलीनुसार पाकिटे तयार करून केंद्रनिहाय बॉक्समध्ये सिलबंद पॅकिंग केले जाते. सदर बॉक्सेस सिलबंद गाड्यांमार्फत जिल्हा कस्टडीमध्ये पाठविले जातात. जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रश्नपत्रिकांची कस्टडी ही शक्यतो जिल्हा कोषागार कार्यालय असते अथवा सी.सी.टी.व्ही. व हत्यारबंद पोलिस बंदोबस्त असलेल्या ठिकाणी असते. गोपनीय मुद्रणालयाकडून आलेल्या प्रश्नपत्रिकांचे बॉक्स हे सिलबंद गाडीतून आले असल्याची व बॉक्सेस व्यवस्थित सिलबंद असल्याची खातरजमा करूनच जिल्हा परीरक्षक व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) याच्या उपस्थितीत, कस्टडीमध्ये सदर साहित्य घेतले जाते.
परीक्षेच्या दिवशी जिल्हा परीरक्षक व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या उपस्थितीत व्हिडीओ रेकॉर्डिंग (चित्रीकरण) करूनच झोनल ऑफिसरकडे केंद्रनिहाय प्रश्न पत्रिकांचे बॉक्स दिले जातात. झोनल ऑफिसर कस्टडी ते केंद्रावर सदर बॉक्सेस पोहोच करतांना या प्रवासाचेही चित्रिकरण केले जाते. केंद्रावर सदर बॉक्सेस मधून प्रश्नपत्रिकांची ब्लॉक निहाय पाकिटे काढून, ब्लॉकमध्ये सिलबंद पाकिटे वाटली जातात. उमेदवारांच्या, परीक्षार्थीच्या समोर सदर पाकिटे उघडली जातात. याच पद्धतीने या परीक्षेच्यावेळीही कार्यवाही झालेली आहे.
राज्यभरातून कोणत्याही ठिकाणाहून प्रश्नपत्रिकांची गाडी सिलबंद नसल्याबाबत अथवा गोपनीय प्रश्नपत्रिकांचे बॉक्सेस अथवा पाकिटे सिलबंद नसल्याची तक्रार प्राप्त झालेली नाही. अथवा असे निदर्शनास आले नाही. म्हणजेच गोपनीय मुद्रणालय ते परीक्षा केंद्र हा प्रश्नपत्रिकांचा प्रवास अत्यंत काटेकोरपणे झालेला दिसून येत आहे. या कोल्हापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे कामकाज उपरोक्त नमूद कार्यपद्धतीनुसार झाल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा या प्रकरणाशी संबंध नाही, असेही श्रीमती ओक यांनी स्पष्ट केले आहे.
0000


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .