डॉ. यशवंत मनोहर : सृजनशील विद्रोहाची ‘स्वप्नसंहिता’

शालेयवृत्त सेवा
0



[ मराठीतील ज्येष्ठ कवी डॉ.यशवंत मनोहर सरांना  वाढदिवसानिमित्त त्यांच्या कवितेवरील लेखाच्या स्वरूपात  प्रसिद्ध साहित्यिक डॉ.अनंत दा. राऊत यांचा लेख देत आहोत - संपादक ]


         आंबेडकरी साहित्यातून आविष्कृत शेणारा विद्रोह केवळ नकारवादी किंवा विध्वंसक स्वरुपाचा नसतो  तर हा विद्रोह मूलत: मूल्यात्म स्वरुपाचा व नवसृजनासाठी धडपडणारा असतो.आपणास हव्या त्या नवसृजनाच्य आड येणाऱ्या क्रूर घरकांना नष्ट करणे अपरिहार्य असते म्हणून विद्रोह या क्रूरतेचा  विध्वंस करू पहात असतो. आंबेडकरी साहित्यातून आविष्कृत होणाऱ्या विद्रोही मान‌सिकतेच्या मुळाशी अथांग अशी करुणा असते. त्या करुणेपोटीच या मनात क्रूर अशा वेदनादायी घटकांविरुध्दचा संताप जन्माला येत असतो. आंबेडकरी साहित्यातून हा संतापच माणसाचे शांत असे विकासोन्मुख जगणे करपविणाऱ्या  हिंस्र अशा पोलादी पहाडांवर विजा होऊन कोसळत असतो. हा पोलादी पहाड सहज नष्ट होणार नसतो. विजा होऊन कोसळणाऱ्या विद्रोही मनालाच तो असंख्य वेळा घायाळ होण्याची पाळी आणत असतो. तरीही हा विद्रोह विज होऊन कोसळणे थांबवत नसतो. काहीही करून त्याला हा हिंस्र पहाड नष्ट करावयाचा असतो आणि त्या जागी सौख्यशांतीची, स्वातंत्र्यसमतेची, ज्ञानविज्ञानाची, प्रज्ञाशीलकरुणेची, न्यायनीतीची, सहिष्णुतेची, भगिनीबंधुत्वाची व उदात्तशा मानवतेची सौंदर्यशाली अशी जीवनबाग फुलवायची असते. याचाच अर्थ आंबेडकरी साहित्यातील विद्रोह हा विध्वंस विप्रोरत नसतो तर सृजनशील स्वरूपाचा असतो.


      डॉ. यशवंत मनोहर हे आंबेडकरी साहित्य प्रवाहातील एक ताकद‌वान असे नाव आहे. कविता, कादंबरी, समीक्षा व वैचारिक लेखनात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा आमीट ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या ‘स्वप्नसंहिता’ या कवितासंग्रहातून सृजनशील विद्रोहाचा आविष्कार झालेला दिसतो. आजवर त्यांचे ‘उत्थानगुंफा’, ‘काव्यभीमायन’, ‘मूर्तिभंजन’ ‘जीवनायन’, 'प्रतीक्षायन', ‘अग्नीचा आदिबंध’ असे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. ‘'सप्नसंहिता’ हा काव्यसंग्रह म्हणजे त्यांच्या काव्यप्रवासातील महत्त्वपूर्ण असा टप्पा आहे.


        ज्या देशातील प्रस्थापित माणसांच्या मनात विषमतावादाचे विषजंतू खोलवर भिनलेले असतात त्या देशातील हक्कवंचितांना खूप मोठी वेदना सोसावी लागते. डॉ. यशवंत मनोहर हे या हक्कवंचित समाजगटातून उदयाला आलेले प्रतिभावान कवी आहेत. त्यांच्या इतर कवितासंग्रहांमधील कवितांमधून जसा व्याकुळ करणाऱ्या वेदनेचा आविष्कार होतो, तसाच ‘स्वप्नसंहिता’मधूनही होतो. मूठभर स्वार्थांध लोक स्वतःचे वर्चस्व कायमचे प्रस्थापित करण्यासाठी समाजातील बहुसंख्य लोकांना मानवी हक्कांपासून वंचित करीत असतात तेव्हा हक्कवंचित लोकांना खूप मोठी वेदना सोसावी लागते. जोवर या हक्क वंचितांच्या मनावर प्रस्थापितांच्या क्रूर धर्माचा प्रभाव असतो, तोवर हे लोक पूर्वजन्मीच्या पापाचे फळ म्हणून आपल्या वाट्याला आलेले वेदनादायी जीवन निमुटपणे जगत असतात पण जेव्हा या लोकांचे माणूस म्हणून असलेले आत्मभान जागृत होते तेव्हा हे लोक वेदनेचा आविष्कार करताकरताच वेदनादायी घटकांच्याविरुद्ध पेटून उठत असतात. यशवंत मनोहर हे वेदनादायी घटकांविरुद्ध पेटून उठलेले सृजनशील कविमन आहे. या कविमनाच्या वेदनेचा आविष्कार ‘स्वप्नसंहिता’मधून फार उत्कटपणे होतो.


     वेदनेतूनच विद्रोहाचा जन्म होत असतो. म्हणून विद्रोहाचे स्वरूप समजून घेत असताना त्यांच्या कवितेतून आविष्कृत होणारी  वेदना आधी समजून यावी लागते. ‘येथल्या आगीमध्ये’ ही वेदना व विद्रोहाचा आविष्कार करणारी ‘स्वप्नसंहिता’तील उत्तम कविता आहे. कवीसाठी आणि त्याच्या सर्वच हक्कवंचित समाजासाठी इथली विषमतावादी विषारी व्यवस्था आग होऊन होरपाळणारीच आहे. इथल्या व्यवस्थेच्या आगीत कवीचा जीव तडफडतो. इथल्या मुलखात पावसातही पाणी जळते. या व्यवस्थेच्या ज्वाळांच्या फांदया कवी नि त्याच्या सर्व समाजाच्या गळ्यात शिरल्या आहेत. इथली व्यवस्था म्हणजे जणू विषबागच. इथल्या या व्यस्थेच्या विषबागेत हक्कवंचित माणसांच्या असंख्य पिढ्यांची असंख्य प्रतिभावान फुले जळून गेल्याचे सूचन मनोहर या कवितेतून भार उत्कटपणे उरतात. कवीच्या दृष्टीने उथली विषव्यवस्था भाळावरचे तरुण चांद‌णे वाहून नेणारी, उरातल्या वेलींचे गाणे हरपून टाकणारी आणि काळ्या पुरात स्वप्नाताले भाव बुडवणारी आहे. कवीच्या स्वप्नाताले गाव स्फटिकासम नितळ शुद्ध अशा सृजनशील मानवी वस्तीचे आहे, परंतु असे गावच ही विषव्यवस्था उभे राहू देत नाही, यामुळे हे कवीमन अत्यंत दुःखी झालेले आहे. तरीही केवळ दुःख करीत न बसता हे क्षितीज नव्याने फुलविण्यासाठी हे कवीमन सूर्याचा शोध घेत फिरते. 


       'उजेडाचा शिरच्छेद’ ही एक वेदनेनेचा उत्कट आविष्कार करणारी कविता आहे. ही संपूर्ण कविताच प्रतिकात्मक स्वरूपाची आहे. यामध्ये कवी म्हणतो दिशांच्या डोळ्यातून आसवे ओसंडत आहेत. इथली नासवलेली माती अनाथ हुंद‌के देत आहे. कोणी तरी सूर्याच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. कोणी तरी चांदण्यावर बलात्कार केला आहे. सुगंधाच्या मोर्चावर तेजाब उधळले गेले आहे. कोणीतरी मातृ‌त्वाचे चांद‌णे विकायला काढले आहे. कुठल्याही क्षणी रक्ताचा पाऊस बरसू शकतो. कवीने वापरलेली ही परिभाषा अत्यंत सूचक स्वरुपाची व मनाला व्याकूळ करणारी वेद‌ना नेमकेपणाने आविष्कृत करणारी आहे. इथल्या व्यवस्थेने वर्षानुवर्षे अनेक क्रांतिकारी व तेजस्वी अशा प्रगतीशील सूर्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आणि अजूनही हे काम सुरूच असल्यामुळे मनोहरांचे कवीमन व्याकूळ झालेले आहे. म्हणूनच त्याला इथे चांद‌ण्यावर बलात्कार केला जातो, असे वाटते. अनेकार्थ सूचकतेचे खूप मोठे सामर्थ्य या कवितेत सामावलेले आहे.


     वेद‌नेच्या उत्कट आविष्काराच्यादृष्टीने 'स्वप्न संहिता' या काव्यसंग्रहातील 'नागडे आशय' ही कविता गंभीरपणे लक्षात घेण्यासारखी आहे. या कवितेतून कवी-मनाच्या उदात्त अशा स्वप्नभंगाची वेद‌ना प्रकट होते. ही वेद‌ना प्रकट करताना ‘नजरेच्या मजबूत दोरीवरती स्वप्नांची प्रेते ओळीने टांगली’ असे कवी लिहून जातो. आपल्या जीवनाच्या वाटचालीत प्रत्येक पावलावर स्फोट होतात. त्यामुळे आपणाला नेहमी फुटत रहावे लागते, याची वेदनाही कवी आविष्कृत करतो. प्रतिकूल परिस्थितीच्या पहाडाला पुन‌:पुन्हा धडका देणे, फाटलेली जिंदगी पुन:पुन्हा शिवत राहणे,आतड्यांच्या गाण्याचे जळत राहणे, पहाटेचे निष्पर्ण होणे, पंखांना दिसणाऱ्या आकाशापर्यंत थडकता न येणे, वाटांचे चकवे देणे, उड्डाणांनी दगे देणे असेच सर्व कवीमनाच्या वाट्याला आलेले आहे. म्हणून हे कवीमन वेद‌नादग्ध झालेले आहे. या कवितेतून आविष्कृत होणारी कवीमनाची ही वेदनाद‌ग्ध स्थिती निव्वळ व्यक्तिगत पातळीवरची नसते, तर फुले शाहू आंबेडकरी विचारधारेने या कवी मनात जे विशाल असे सुंदर स्वप्न ओतलेले आहे, ते स्वप्न साकार करण्याच्या दिशेने कितीही वाटचाल केली तरी अजुनही इथल्या क्रांतिकारी चळवळींच्या वाट्याला घायाळ होणेच येते आहे, या बद्दलची ही सामाजिक वेदना आहे. ‘आणि समुद्रही आटलेले’ या कवितेतून देखील अशाच वेद‌नेचा आविष्कार कवीने फार प्रभावीपणे केला आहे. 'घाई घाईने ढोरे स्वतःच कसायाकडे निघालेली आहेत' हे कवीचे चिंतनगर्भ असे काव्यात्म विधान फार सूचक स्वरूपाचे आहे. ‘बेपर्वा गर्दीत माझी लाडकी स्वप्ने चेंगरली जात आहेत, आग झालेली डेरेदाखल नदीत आणि समुद्रही आटलेले आहेत.’ या ओळींमधून देखील नव्या आदर्श अशा मानवी समाजाचे स्वप्न पाहणाऱ्या पण ते स्वप्न साकार होत नसल्यामुळे हैराण झालेल्या कवीमनाची विदारक अशी वेद‌नाच प्रकट होते.


     ‘स्वप्नसंहिता’ या यशवंत मनोहरांच्या काव्यसंग्रहात सरण, चिता, ही प्रतिमा चौदापेक्षा अधिकवेळा आलेली आहे. कवितेमध्ये पुनःपुन्हा येणारी ही प्रतिमा कवीमनाची वेदनाच तीव्रतेने प्रकट करने. इथल्या पिकात चहुदिशातील सरणे शिरली आहेत. असे म्हणणारा हा कवी प्रतिकात्मक रीतीने स्वतःच्या मनाची वे‌दनाच आविष्कृत करतो आहे. ‘पायाखाली जळती सरणे आणि नजरेत ओलाव्याचे स्वप्न होते, आयुष्यावर कोसळत होता अंधार आणि काळजात सूर्याचे बियाणे होते’ या 'जहरांची मरणे' या कवितेत येणाऱ्या ओळी कवीमनाच्या क्रांतिकारक वाटचालीतील वेदना तर आविष्कृत करतातच परंतु प्रतिकूल परिस्थितीने कितीही वेद‌नेच्या डागण्या दिल्या तरी नवसमाज निर्मितीच्या ओलाव्याचे स्वप्न घेऊन हा कवी काळजाकाळजात सूर्य बीजे पेरण्याचे काम थांबवत नाही, ही त्याची विद्रोही भूमिकाही यातून सूचित होते. अशाच भूमिकेमुळे हा कवी स्मशानातही सुगंधत राहण्याचे काम करतो. कधी कधी हा कवी ‘माझ्या सरणाला कोणीतरी जाळ मागते’ असे म्हणतो. ‘माझ्या चितेला तुझ्या स्मृतींचा आडोसा असतो’ असे म्हणतो. 'सत्याप्रमाणे बहिष्कृत आम्ही, समतेप्रमाणे सरणात आम्ही' असे म्हणतो. 'खूपदा चांदणे सरण होऊन बिलगले कधि सरणातही चांद‌णे फुलले' असे म्हणतो. तर कधी ‘स्वप्ने पडायची मरणांची, सामुहिक सरणांची’ असे म्हणतो. अशा विविध पद्धतींनी या काव्यसंग्रहात येणारी सरण ही प्रतिमा कवी मनाची वेद‌ना तर प्रकट करतेच परंतु त्याचबरोबर त्याच्या मनातील विद्रोहाचे नवसृजनशील स्वप्नही आविष्कृत होते.


       आंबेडकरी कविता ही केवळ वेदनेचे रडगाणे गाणारी कविता नाही. तर ती अस्मिता जागृत झालेल्या मनाची कविता आहे. ही कविता वाट्याला आलेल्या वेद‌नेचा उत्कट असा आविष्कार करता करताच इथल्या विषारी व्यवस्थेतील वेद‌नादायी घटकांचा शोध घेते आणि अशा घटकांच्या विरुध्दचे युद्ध पुकारते. वेदनादायी घटकांशी संघर्ष करून आपल्या स्वप्नातील आदर्श जसा मानवी समाज निर्माण करण्यासाठी धडपडते. ‘स्वातंत्र्यास’ या कवितेत कवी यशवंत मनोहर आपल्या वाट्याला आलेल्या नरकासमान जीवनातून मुक्ती मिळविण्यासाठी युध्दावाचून दुसरा पर्याय नाही, असे म्हणतात. ‘ही माणसे’ या कवितेतून हक्कवंचित अशा आजवर गुलामीचे जीवन जगणाऱ्या माणसांनी पुकारलेला विद्रोहच शब्द‌बद्ध करतात. यापुढेही माणसे माना खाली घालून जगणार नाहीत तर ती आगीलाच आग लावतील. सडलेली डोकी जाळणारी ही माणसे थडग्यातून बाहेर येत आहेत. आता हे भीक मागणार नाहीत तर भीक देणारे शोषक हात कलम करतील. आता हे तुमच्यापुढे वाकणार नाहीत. ते विजांचे लोळ होऊन तुमच्या अहंकाराचा व स्ववर्चस्ववादाचा कोळसा करतील. ही माणसे आता युगायुगाच्या बेड्या तोडत आहेत. स्वतःच स्वतःचे दीप होत आहेत. ते महायुद्धाचे लेक आहेत. ‘ढग धावावेत आकाशात तसे हे स्वप्नांचे बाप धावत आहेत, यांच्या डोक्यात क्रांती आणि हातात समतेची शस्त्रास्त्रे आहेत.’ या संपूर्ण कवितेतून सृजणशील विद्रोहाचा आविष्कार फार सहजपणे झाला आहे. 


       विद्रोही मन हे आपल्या समोरच्या प्रतिकूल परिस्थि तीशी सतत झगडत असते. हा झगडा नवनिर्माणासाठीच सुरु असतो. या नवनिर्माणासाठी कोणतीही किंमत चुकवावी लागली तरी विद्रोही मन त्यासाठी सदैव तयार असते. ‘सूर्यासाठी क्षितिज झालो मी’ या कवितेत डॉ. मनोहर म्हणतात, मरण झडितही मी माझी स्वप्नप्रिया मरू दिली नाही. पंख जायबंदी झाले तरी मी उड्डाणे घेत राहिलो. गळ्यावर करवत चालली तरी त्या गळ्यातून अंगारच गात राहिलो. भयावह कशा प्रतिकूल परिस्थितीशी चिवटपणे लढत राहण्याचीच ही विद्रोही वृत्ती आहे. 'मी' ही एक या काव्यासंग्रहातील सृजनशील विद्रोहाचा प्रभावी असा आविष्कार करणारी कविता आहे. या संपूर्ण कवितेतून एक विद्रोही मनच स्वत:च्या संदर्भात बोलताना दिसते. या विद्रोही मनात सुक्त असे जीवन जगण्याची तेजोमय आसक्ती आहे. या मनाला प्रज्ञा नि प्रेमाची अथांग तहान भूक लागलेली आहे. हे मन म्हणजे उपाशी पोटांचा आक्रमक आकांत आहे. गरिबीने तुडविलेल्यांची अजिंक्य आशा आहे. न्यायासाठी उफाळलेला हा पहाडी निर्धार आहे. लाचार मनांना आलेली निर्णायक धार आहे. अडथळे जाळत धावणारी उग्र वीज आहे. पण अडथळ्यांवर आग होऊन कोसळणाऱ्या या विजेसारख्या मनात आपल्या घरट्यातील पिलांवर लक्ष ठेवणाऱ्या, हवेत उडणाऱ्या घारीप्रमाणे माणसांवरील माया आहे. आगीत नक्षत्रे पेरणे, काटेरी आव्हानांना स्वीकारणे, वाळवंटाच्या झाडाची पालवी होणे, थंडगार बर्फाला जाळणारा अंगार होणे ही या विद्रोही मनाची वैशिष्ट्ये आहेत. हे विद्रोही मन म्हणजे नव्या विषविहीन विश्वकुटुंबाचा पाया आहे. या संपूर्णच कवितेतून विद्रोही मनाची आवेशपूर्ण अशी संघर्षशील वृत्ती व नवनिर्माणाची जिद्द उत्कट रीतीने प्रकट होते. ‘हे होतेच’ या कवितेतून विद्रोही मनाची काही वैशिष्ट्ये फार प्रभावीपणे आविष्कृत झाली आहेत. याकवितेत कवी म्हणतो भोगवटेच क्रांतीच्या रणधुमाळीत उड्या घेतात. अशीच माणसे वाऱ्याचीही दिशा बद‌लतात, कधीतरी ही अशांतताच पेट घेते आणि अनिर्बंध उठाव होते. तुरुंगात सडवले किंवा फासावर चढवले तरी तिच्या उरातील इन्कलाबचा संगर कायम असतो. नाकातोंडात पाणी गेले की लाचारीही बेफाम होते. मिळतील ती शस्त्रे घेऊन घृणेची मुंडकी कापून काढते. या सर्वच जाणिवा वेद‌नादायी घटकांशी अपरिहार्यपणे कराव्या लागणाऱ्या संघर्षाची मांडणी करतात.


      स्वप्नसंहिता या कविता संग्रहामध्ये ‘मा...!’ही एक अत्यंत भावगर्भ अशी कविता आहे. या कवितेतून कवीमनाने आपल्या आईशी केलेला, वेदनेने ओथंबलेला भावगर्भ असा संवाद तर प्रकट होतोच. परंतु त्याचबरोबर विद्रोही मनाचा होत असलेला स्वप्नभंगही उत्कटतेने प्रकट होतो. फुलांसोबत झुलणे ताऱ्यांसोबत फुलणे, पाखरांच्या गाण्यांचे निळे सौंदर्यशास्त्र लिहिणे, सुगंधाची फुगडी खेळणारा वारा होणे, लोकांना जाळणारी आग विझवणे, मनामनात करुणेचा बोधीवृक्ष पेरणे ही या विद्रोही मनाची उदात्त स्वप्ने असतात. पण या स्वप्नांची वाताहतच होते. उजेडाच्या विरोधात अंधाराचेच संघटन होते. वाट्याला एक 'सिसिफसपणा' येतो.पावलांपुढे पहाडच पायघड्या होतो. विद्रोही मनाच्या स्वप्नभंगामुळे त्याला प्राप्त होणारी वेदनाद‌ग्ध स्थिती या कवितेतून फारच उत्कट रीतीने प्रकट झाली आहे. ‘सूर्य.....!’ ही या काव्यसंग्रहातील दीर्घ अशी चिंतनशील भावकविता आहे. या कवितेतूनही विद्रोही मनाची काही वैशिष्ट्ये नेमकेपणाने प्रकट झाली आहेत. या कवितेत कवी तेजस्वी अशा सूर्याशी संवाद साधू पाहतो. त्याला सूर्य आंबेडकरांसारखा वाटतो. मला सूर्य व्हायचे आहे त्यासाठी तू मदत कर. मला अखंड जळण्याची दीक्षा दे, अखंड जागण्याची विद्या दे, मला संपूर्ण उजेड होऊ दे, मला संपूर्ण सूर्य होऊ दे, मला अखंडपणे जळत राहून सर्वच डोळ्यांमध्ये उजेड व्हायचे आहे. मला सूर्य होऊ दे. अशी मागणी हा कवी सूर्याकडे करतो. कवीमनाची ही मागणी आपला समाज ज्या वैविध्यपूर्ण स्वरुपाच्या अंधारामध्ये खितपत पडलेला आहे त्याला सर्वांगीण प्रगतीच्या प्रकाशात आणण्याचे सामर्थ आपल्यात यावं यासाठीच केलेली आहे. एकूणच या काव्यसंग्रहातून आविष्कृत होणारे विद्रोही मन नव सृजनासाठी आसुसलेले आहे, असेच म्हणावे लागते.


       स्वप्नसंहिता या काव्यसंग्रहातील जवळ जवळ सर्वच कविता अनेकार्थसूचक अशा प्रतिकात्मक भाषेमध्ये प्रकट झालेल्या आहेत. चिंतन‌शीलता, भावगर्भता, क्रांतीकारकता, आशावाद ही या कवितेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. या काव्यसंग्रहामधील जवळ जवळ सर्वच प्रतिमा ज्यांचा स्वतंत्रपणाने विस्ताराने विचार करावा अशा स्वरूपाच्या आहेत. पण इथे काही लक्षणीय प्रतिमांची नोंद घेऊ. उदा. काळ्या पुरात स्वप्नातले गाव बुडणे, सूर्याचे अश्रूवाचून केविलवाणे एडणे, काळोखाचे बांधकाम उध्वस्त करणारा सेक्युलर बुलडोझर होणे, श्वासांना जहराच्या डोहात ढकलणे, जहराच्या झडितही काही ज्वालांच्या झाडांचे हसत मोहरणे, रस्त्यातील जहरी खिळे वेचणारांची काळजे घायाळ होणे, अशक्यतांचा तुरुंग तोडून क्रांतीचे उड्डाण घेणे, काट्यांना रक्तबंबाळ करणाऱ्या पायांचे पोलाद होणे, चांद‌णे वेचणारे छांदस हात, झिम्म्यात उतरणाऱ्या क्षणांचे कात टाकून येणे, सरणांची झड घेऊन येणारी आठवण, चांद‌ण्यावरील बलात्कार, रक्तबंबाळ तारांगण, विजा झेलणारे झाड, संकटांच्या सागरातली नाव, नकारांचा निवडूंग, जहराच्या लाटा, मरण झडीतील स्वप्रिया, आयुष्यावर कोसळणारा अंधार, पायाखालची जळती सरणे, काळजातील सूर्याचे बियाणे, जहरांची मरणे, हंबरणाऱ्या फांद्या, हरवलेले झरे, रक्तातील वणवे, सरणालाच जाळ मागत राहणे, रक्तामधले चंद्रधुमारे मरणे, लांडग्यांच्या प्रेमात पडलेली मेंढरे, व्यवस्थेने छूलावलेली सांगकाम्या कुत्र्यांची फौज, भगव्या यंत्रणेचे धर्मसंसदेचे हलाहल पुढे करणे, संविधानाचा जीव यासारख्या असंख्य चिंतनगर्भ व अनेकार्थ सूचक प्रतिमा डॉ. यशवंत मनोहरांनी या संपूर्ण काव्यसंग्रहात जागोजागी पेरलेल्या आहेत. या प्रतिमांच्यामुळे या संग्रहातील कवितांची गुणवत्ता अधिकच वाढली आहे.


       यातील ‘तुम्ही बुध्दाचे काय केले?’ ‘तुम्ही’, ‘हैप्पी बर्थ डे बु‌द्धा’ यासारख्या कवितांमधून डॉ. मनोहरांनी चांगलीच स्वटीका केली आहे. ‘असेही नाही’ या कवितेतून उत्तम असा आशावाद प्रकट केला आहे. ‘हे खोटे नाही’  यासारख्या कवितेतून ‘जहर पाजून ठेवलेली माणसे शुध्दीवर याय‌ला जरा वेळ लागणार, जग उलथू पाहणारांनाच थोडे उलथे पालथे व्हावे लागणार, छोटे छोटे पराभव तुडवूनच क्षितिजात मोठा विजय उगवतो, अडचणींची गर्दी कापत जाणारी वाट अधिकच सर्जन असते. जहरांच्या झडितही काही ज्वालांची झाडे हसत मोहरतात. सामान्य माणसेच तापतात तेव्हा आकाशही वितळते, यासारख्या अनेक सुभाषितवजा ओळी आलेल्या आहेत. कवीमनात चाललेल्या मानवी जीवनाच्या संद‌र्भातील गंभीर अशा चिंतनामुळेच असे घडताना दिसते.


      भारतीय संविधान हा कवीमनातील श्रद्धेचा व आशावादाचा विषय आहे. म्हणून या काव्यसंग्रहात तेरापेक्षाही अधिक कवितांमध्ये कवीने संविधान या शब्दाची नोंद केलेली दिसते. उदा. संविधान संस्कृतीचा प्रयोग कुठून कासा सुरु करावा, तू माणूस होण्यासाठी संविधान कुठले लिहू?, नसे मान्य आम्ही संविधान होणे, आंबेडकर नावाच्या क्रांतीसूर्याचे संविधान, उजेडाच्या संविधानापासून दूर जाणे, सुगंधाचे संविधान हाती देणे, सेक्युलॅरिझमचे संविधान, मनुस्मृतीवर संविधानाचे कव्हर लावणे, संविधानाचा जीव. वेगवेगळ्या कवितांमधून संविधान या शब्दाच्या कवीने केलेल्या या पेरणीमधून कवी भारतीय संविधानाकडे आशावादी दृष्टीने पाहतो आहे, असे दिसते. सांविधानिक अंगाने आणखी सखोल असे चिंतन केले गेले तर या कवीच्या हातून देखील संविधानाच्या संद‌र्भात उत्तम दर्जाच्या कविता लिहिल्या जाऊ शकतात.


       ‘स्वप्नसंहिता’ मधील काही दीर्घ कवितांमध्ये उत्कटता असली तरी जरासा पसरटपणा आलेला आहे. काही ठिकाणी जिला अपरिहार्यच म्हणता येईल अशी पुनरुक्ती झालेली आहे. नेल्सन मंडेला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी  संवाद साधणारी बाप ही कविता, 'मा' ही आईशी संवाद साधणारी कविता या अत्यंत चिंतनगर्भ व उत्कट अशा कविता आहेत. परंतु भगवान तथागत बुद्धांना ‘हॅप्पी बर्थ डे बु‌द्धा, हॅप्पी बर्थ डे’ अशा शब्दांमध्ये संबोधित करणे आणि संपूर्ण कवितेतून तशाच पध्दतीने बुद्‌धांशी संवाद साधू पाहणे अनुचित वाटते. कवी डॉ. यशवंत यशवंत मनोहर या कवितेमधून तथागत बु‌द्धांचा अनादर करतात असे नाही परंतु तरीही वरील पध्दतीची त्यांची परिभाषा रुचण्यासारखी आहे असे म्हणता येणे अवघड  आहे. अशाप्रकारचा किंचितसा अरुचकर स्वरुपाचा भाग या काव्यसंग्रहात आढळला तरी ‘स्वप्नसंहिता’ या काव्यसंग्रहाची गुणवत्ता मोठी आहे. 


      आंबेडकरी काव्यप्रवाहातील काही अपवादात्मक कवी वगळता कुणालाही उत्कृष्ट अशी छंदोबद्ध कविता लिहिणे जमलेले नाही. परनतु डॉ. यशवंत मनोहरांनी मात्र आपल्या विद्रोही जाणिवेला व व्यापक अशा चिंतनशीलते‌ला तिळभरही मुरड न घालता उत्तम अशी छंदोबद्ध कविता लिहिली आहे. चिंतनशीलते सोबतच तरलता, सूक्ष्मता, भावगर्भता, प्रतिकात्मकता, लयबध्दता, अनेकार्थसूचकता हे सर्वच काव्यगुण डॉ. यशवंत मनोहर यांच्या ‘स्वप्नसंहिता’ या काव्यसंग्रहातील कवितेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. सामाजिक जाणिवेची उत्तम कविता वाचण्याची भूक असलेल्या रसिकांनी ही 'स्वप्नसंहिता' जरूर वाचली पाहिजे. उत्तम कवितेच्या अभ्यासकांना यातील कवितेवर विविध अंगांनी विचार करण्यास खूप मोठा वाव आहे. कारण ‘स्वप्नसंहिता’ मधील कविता नवसृजनशील अशा विद्रोहाने ठासून भरलेली आहे.


- डॉ. अंनत दा राऊत ' नांदेड

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)