समाजव्यवस्थेतील नैराश्यावर उपाय म्हणजे भारत सातपुतेचे 'जागरण '
आत्मकथन परखडपणे लिहिणे हे ही एक आव्हानाच असते. ते आवाहन भारत सातपुते यांनी चांगले पेललेले आहेत. मुळात 'जागरण' करणाऱ्या सर्वसामान्य गोंधळी समाजाच्या घरात लेखकाचा जन्म झाला. हा जन्म रात्रभर 'जागरण' करण्यात न घालवता लेखक समाज जागृतीसाठी पुढाकार घेऊन अनेक पुस्तके लिहून, अनेक व्याख्यान देत महाराष्ट्रभर फिरतात. हा सारा बदल शिक्षणाने झाल्याची कबुलीही ते देतात. जीवनात अनेक चढ-उतार आले तरीही न डगमगता धैर्याने तोंड देणे हेच आपले कर्तव्य आहे याची शिकवणूक जणू ते या पुस्तकातून देतात. सुपारी घेऊन 'जागरण' करण्यापेक्षा पुस्तकं वाचून माणुसकीचे 'जागरण' करणे किती महत्त्वाचे आहे.
अपयश किंवा संकटांमुळे खचून न जाता, ध्येयाकडे कसे वाटचाल करावे, याचा वस्तुपाठ हे पुस्तक नव्या पिढीसमोर मांडते. जागरण' या आत्मचरित्राबद्दल अजून काही खास गोष्टी अशा आहेत की, हे पुस्तक केवळ एका व्यक्तीचा इतिहास नाही, तर तो एका सामाजिक परिवर्तनाचा दस्तऐवज आहे. लेखकाने स्वतःच्या आयुष्यातील यशासोबतच आपल्या चुकलेल्या गोष्टींची आणि संघर्षाची प्रामाणिक कबुली दिली आहे. ही पारदर्शकता वाचकाला लेखकाशी भावनिकरीत्या जोडते.
मी ही शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे ही कादंबरी वाचताना अनेक घटनांशी जुळतांना दिसत होतो. प्रशासनाचे अनुभव वाचतांना अनेक प्रसंग डोळ्यापुढे येत होते. गावकऱ्यांची वेगवेगळी व्यक्तिरेखेचा कादंबरीत उल्लेख असला तरी प्रत्येक गावाचे प्रतिनिधीत्व करताना दिसतात. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका किंवा खिचडी शिजवणारा कामगार, शाळेचा सेवक कांदबरीत सत्य घटना असल्या तरी त्या व्यक्तिरेखा सर्वत्र दिसतात. म्हणून 'जागरण भारत सातपुतेचे आत्मकथन जरी असले तरी ते वाचताना शिक्षण क्षेत्रातील अनेक शिक्षकांच्या जीवनाशी निगडित असल्याने ते 'लोकार्मय' झालेले आहेत.
'सुट्टीविनाश शाळा' वार्षिक स्नेहसंमेलन, स्वंयशासन दिन, वृक्षारोपण, शैक्षणिक सहली, रात्रशाळा, सकाळचा योगा, असे शाळेत राबित असलेल्या विविध उपक्रमाने ते नेहमी चर्चेत राहिलेले आहेत. तसेच खोटा गुन्हा, निलंबन, आजार, यावर मात करून राज्य पुरस्कारपर्यंत मजल मारणारे लेखक भारत सातपुते अनेक पुस्तकाचे आणि पुरस्काराचे धनी आहेत.
लेखकाने शिक्षण क्षेत्रात काम करताना भ्रष्टाचार आणि चुकीच्या प्रवृत्तींविरुद्ध जो लढा दिला, तो वाचकांना प्रेरणा देणारा आहे. या पुस्तकात मराठवाड्यातील बोलीभाषेचा गिचलीय, नादर, मुदी, फुफूटात सुंदर वापर केला आहे, ज्यामुळे ग्रामीण लोकजीवनाचा अनुभव अधिक जिवंत होतो. केवळ स्वतःच्या यश न सांगता, समाजव्यवस्थेतील नैराश्य आणि त्यावरील उपाय यावर हे पुस्तक भाष्य करते. भारत सातपुते यांचे 'जागरण' हे आत्मचरित्र म्हणजे केवळ एका व्यक्तीचा जीवनप्रवास नसून, तो एका प्रामाणिक कार्यकर्त्याचा आणि शिक्षकाचा 'सत्यशोधाचा प्रवास' आहे. हे आत्मचरित्र लेखकाच्या गरिबीतील संघर्षाचा आलेख मांडते.
पुस्तक परिचय :
◾यादवपुत्र रमेश मुनेश्वर
संवाद : ७५८८४२४७३५
( राज्य पुरस्कृत शिक्षक तथा बालभारती सदस्य )


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .