दहावीची परीक्षा दिशादर्शन करणारी प्रकाशवाट असते-डॉ. गोविंद नांदेडे यांचे प्रतिपादन

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

दहावीची परीक्षा आणि या  परीक्षेतील उज्ज्वल यश हे  जीवनाची दिशादर्शन करणारी  प्रकाशवाट असते. हीच परीक्षा पुढे आयुष्याला प्रेरणा देत नवनव्या  संधींची दार उघडत असते, असे प्रतिपादन राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांनी केले आहे. ते गोकुळनगरातील  अशोक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या देदीप्यमान यश प्राप्त केलेल्या यशवंतांच्या सत्कार समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव चांडोळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.


प्रमुख अतिथींचा प्रारंभी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुधाकर देव यांनी शाळेतील इयत्ता दहावीतील यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी साईनाथ मुदखेडे, कृष्णा हेरे, रेणुका गवळी, साक्षी राणे, संध्या मुधोळ, नरसिंग टेकवार, स्वाती कुरुडे, श्रेयसी वानखेडे, राधिका कळणे, आणि शौर्य वानखेडे या सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या यशवंतांचा पालकांसह  सत्कार करण्यात आला. अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक गंगाधर वनंजे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 


या प्रसंगी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रेमाला बद्देवाड यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणातून  व्यंकटराव चांडोळकर यांनी विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये तीव्र उन्हात न फिरता अकरावीचा  अभ्यास पूर्ण केल्यास बारावीची तयारी लवकर सुरू करता येईल असे सांगून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दत्ता टोकलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक हौसाजी नागरगोजे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)