वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे
पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे
सांगली ( शालेय वृत्तसेवा ) :
गझल, काव्य लेखनात आकंठ बुडून समर्पित आयुष्याने मराठी, हिंदी व उर्दू साहित्य विश्व समृद्ध करणारे कोहिनूर ए गझल इलाही जमादार यांची चालती-बोलती गझल आज शांत झोपली. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातल्या दुधगाव या जन्मगावी पारंपारिक पद्धतीने इलाही जमादार यांचा दफनविधी करण्यात आला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध क्षेत्रातील त्यांच्या चाहत्यांनी आपल्या लाडक्या 'इलाही'ना साश्रूनयनांनी निरोप दिला.
गझलकार इलाही जमादार यांचे काल दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजताच्या सुमाराला वृद्धापकाळाने निधन झाले. अवघ्या तासाभरात विविध प्रसारमाध्यमांद्वारे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वार्यासारखी ही वार्ता पसरली.
दुधगाव-सांगलीकर अचंबित..!
विविध माध्यमावर इलाही जमादार यांच्या निधनाचे वृत्त झळकल्यानंतर त्यांचे जन्मगाव आणि सबंध सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली. जिल्ह्यातल्या छोट्याशा दुधगावचे नाव मोठे करणारा माणूस जिल्ह्यातच अनभिज्ञ असावा; याविषयी जागोजागी लोक चर्चा करताना दिसून आले. इलाही जमादार यांच्या अंत्यविधीचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या काही माध्यम प्रतिनिधींनीही इलाही जमादार यांच्या विषयीच्या माहितीचा अभाव असल्याची कबुली दिली. इलाही जमादार यांच्या अंत्यविधी यात्रेला सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुरुवात झाली. दफनभूमी समोर असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळा प्रांगणात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर दफनभूमीत सामूहिक नमाज अदा केल्यानंतर धार्मिक विधीनुसार त्यांचा दफनविधी पूर्ण करण्यात आला.
शोकसभा
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले रसिक, कवी, साहित्यिक गझलकार व कलावंतांनी इलाही जमादार यांच्या साहित्य आणि आचार- विचारांचे विविध पैलू आपल्या मनोगतामधून उजागर केले. या शोकसभेत प्रशांत पेंडसे, प्रशांत दिंडोरकर, डॉक्टर रासगे, प्रा. विकास कदम, अशोक डोंगरे, बी.के. कांबळे, दीपक नरवाडे, लक्ष्मी लहाने, संभाजी हामंद, विमल मुदाळे, प्रा.संध्या पाटील कराड, अरविंद पाटील, दत्ता नंदे, प्रकाश शिंदे, सचिन दिंडोरकर , राहुल दिंडोरकर, सुहास दिंडोरकर, नीलेश बेलसरे, मंगेश रुपटक्के, संतोष घुले, नवनाथ शिनगारे, लक्ष्मण पोटभरे, आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
मरणोत्तर पुरस्काराची मागणी
या प्रसंगी अनेक साहित्यिक व विचारवंतांनी इलाही जमादार यांची साहित्यसंपदा प्रगल्भ आणि समृद्ध होती, असे सांगितले. त्याचबरोबर तहहयात इलाही जमादार यांची मात्र उपेक्षाच झाली, अशी खंत यावेळी बोलून दाखवण्यात आली. जिवंतपणी नाही तरी त्यांना मरणोत्तर पद्मभूषण तसेच इतर पुरस्काराने गौरवान्वीत करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. दुधगाव येथे 'इलाही' यांचे स्मृतिस्थळ उभारून त्यांचे साहित्य अभ्यासकांसाठी उपलब्ध करून देण्याचा संकल्पही यावेळी आणि त्यांनी बोलून दाखविला. प्रारंभी इलाही जमादार यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी पाठवलेले शोक संदेशांचे वाचन करण्यात आले. अंत्यविधीसाठी दूधगावातील सरपंच, गावकरी तसेच महाराष्ट्रातून उपस्थित झालेल्या अनेक साहित्यिकांचा समावेश होता.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .