प्रत्येकाच्या मनात नवा आशावाद पेरणारा अरुण विघ्ने चा कवितासंग्रह.. 'मी उजेडाच्या दिशेने निघालो !'

शालेयवृत्त सेवा
0




'अरुण विघ्ने' एक साहित्यिक चळवळीतील नावाजलेलं नाव. 'पक्षी', 'वादळातील दीपस्तंभ',  'जागल' या तीन यशस्वी कवितासंग्रहानंतर 'मी उजेडाच्या दिशेने निघालो' हा कवितासंग्रह साहित्यक्षेत्रात नुकताच दाखल झाला आहे. पत्रकारितेसह कविता समीक्षण, गझल, विविध विषयावर स्फुट लेखन, व्यक्तिविशेष लिहिणे हा त्यांचा आवडता छंद. सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक असलेल्या अरुण विघ्ने यांना नागपूरचा स्व अरविंद बाबू देशमुख विदर्भस्तरीय शोध पत्रिकारिता पुरस्कार, नवी दिल्ली चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी फेलोशिप, अकोल्याचा राज्यस्तरीय काव्य पुरस्कार, मुंबई चा साहित्य भूषण पुरस्कार, औरंगाबादचा आदर्श शिक्षक पुरस्कार, माहुरचा साहित्यभूषण पुरस्कार, नांदुराचा लोककवी पुरस्कार, अकोला येथील बोलीभाषा साहित्यकृती पुरस्कार, ठाणे येथील जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. तर 'आधुनिक परिवर्तनशील साहित्याचे आकलन व व्याप्ती' हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.


कविमित्र अरुण विघ्ने यांच्या 'मी उजेडाच्या दिशेने निघालो' या कवितासंग्रहाच्या शीर्षकातच आशावाद आहे, ऊर्जा आहे, उर्मी आहे, नवा आयाम आहे. कवीला या संग्रहातून नेमके काय सांगायचं हे शीर्षकावरूनच कळून येते..


" हे करुणाकार बुद्धा

अखिल विश्वाचा प्रवास करून

लाखो खाचखळग्यातून चालताना

तृष्णेच्या कोटी कोटी दगडांना ठेचाळून

रक्तबंबाळ होऊन थकलेली माझी पावलं

आता तुझाच अष्टांग मार्ग चोखाळणार आहेत.."


क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आम्हास जगण्यास आणि लढण्यास बळ देते. त्यांचा इतिहास आम्हाला नवा इतिहास लिहायला स्फूर्ती देते. त्यांच्या विचारांची धग कायम आमच्या मस्तकात राहावी म्हणून महामानवांना नतमस्तक होताना 'ज्योतिबा' व 'ऊर्जादायी दीक्षाभूमी' या कवितेत कवी लिहितो..


"तुम्ही वंचिताचे, उपेक्षितांचे, शोषितांचे, अस्पृश्यांचे 

क्रांतीबा आणि क्रांतीमा..

होऊन ओढलात आसूड तत्कालीन व्यवस्थेवर.."


आणि


"बुद्धांच्या विज्ञानवादी विचारांना दीक्षाभूमीवर आमचं 

आयुष्य धम्मचक्रप्रवर्तन झालं कायमचं 

तेव्हापासून दीक्षाभूमी आमची ऊर्जादायी ठरली.."


कवी विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुका त्यातील रोहणा गावाचा त्यामुळे वऱ्हाडी चा लळा असणारच. अनेक कविता वऱ्हाडी भाषेत आहेत. आई आणि वडील यावर अनेकांनी लिहिलं, लिहीत राहणार कारण हा विषय संपणारा नाही. 'माय झाडाची सावली' व 'असाच असतो बाप' या कवितेत कवी लिहितो..


"माय झाळाची सावली 

साऱ्या जगाची माऊली 

सोता जाये दुखामंदी 

दुजा सुखाची सावली

माय लेकराले जपे 

जशी डोळ्याची पापणी 

होता डोया आड लेक 

गाय हंबरते मनी.."


आणि


"घराला धीर व आधार असतो बाप 

स्वतःचे हुंदके हृदयाच्या आत कोंडून ठेवून दुःखातही

हसणारा व हसवणारा विदूषक बनतो बाप

प्रसंगावधान राखून कुटुंबीय समोर भन्नाट अभिनय

करणारा नटसम्राट असतो बाप.."


शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, कामगाराचे, मजूरदाराचे वेदना कवीला क्षणोक्षणी जाणवते नव्हे तो अनुभवतो. म्हणून तितक्याच ताकदीने त्यांची लेखणी शब्दबद्ध होते.

'शेतातल्या मातीस मी' व 'ठसे कामगारांच्या पावलांचे' या कवितेत कवी लिहितो..


"शेतातल्या मातीस मी खाण्यास दाणा मागतो

कर्जातूनी मुक्तीस मी थोडा खजाना मागतो 

झाला कसा नादार हो देशातला पोशिंदा 

शेतात थोडा पेरण्या मी बी बियाणा मागतो.."


आणि


"बोलतात पाय बघा हे कष्टकऱ्यांचे 

सलतात दुःख काळजात वेदनांचे 

भेगाळली पावले सत्य सांगते आहे 

हेच जीने आहे सोशीत मानवांचे.."


गझल हा काव्य प्रकार वेगळा असल्याने कवीनी हा प्रकार सुद्धा फारच चांगल्या तऱ्हेने हाताळताना दिसतात. या संग्रहात अनेक गझल वाचावयास मिळतील. काही शेर तर लाजवाबच ! एका सांजी ची सोय, सत्कार, मिळतो का सन्मान, ओठावरील गाणी, माणसाला माणसाशी, वेदना अंतरी ची गळू लागली, वेदनेला सातवनाचे हात नाही, सोकलेले घाव नाही, माझ्याच माणसांनी, ओळखीची एक चाल आहे, मी वाचलोच नाही, मी भाळत मुळीच नाही, मानतो आम्ही, आदी.


"सूर्या परी मी झालोच नाही

ज्ञानावरील कुणाच्या मी गाजलोच नाही 

केला प्रयास त्यांनी घेऊ नये ऊभारी 

सिन्हापरी कुणाला मी बांधलोच नाही.."


आणि


"वादळांच्या वंशजाना मानतो आम्ही 

पेटणार्‍या विस्तवावर चालतो आम्ही 

आजही रक्तात बाणा सिद्धनाकाचा 

उठणारे हात आता छाटतो आम्ही.."



निसर्ग पर्यावरणवादी सामाजिक कवितेतून कवी आजचे वास्तव अधोरेखित करतो. मानवाच्या गरजा वाढल्या निसर्गाला न जुमानता जो वागत असतो त्याचा परिणामही तोच भोगताना दिसतो. म्हणून कवी 'ते हे रान आहे' या कवितेतून मानव जातीला पर्यावरणवादी इशारा दिला आहे..


"कापलेले वृक्ष आहे पेटते हे रान आहे 

जंगलाच्या पाखरांची आज दाणादाण आहे 

वात पाणी प्रदूषणाने जीवनाचा घात आहे

माणसाने माणसाचा कोंडला तो प्राण आहे.."


कवी म्हणतो संविधान म्हणजे मानव मुक्तीचा जाहीरनामा. पिढ्यानपिढ्या चा अंधार दूर करणारा उजेडाशी करारनामा. संविधान म्हणजे घटनाकारांच्या कुशाग्र बुद्धीचा जागर. शोषितांच्या वंचितांच्या आयुष्याचा उदार. सर्वांना न्याय समता स्वातंत्र्य बंधुता प्रदान करणारा दस्तऐवज. आर्थिक सामाजिक राजकीय शैक्षणिक सामाजिकतेचा सलोखा.. 


"नवोदित क्रांती सुर्यांनो 

पहाट उद्याची शोधून घ्या

काळोखात भवितव्याच्या

तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा.."


आणि


"भरकटलेली पावलं

तुझ्याकडेच येत आहेत शांतीदूता

मी उजेडाच्या दिशेने निघालो आहे.."


अरुण विघ्ने यांच्या कविता एका पेक्षा एक सरस आहेत, वाचनिय आहेत. मी तर म्हनेल एखाद्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास लागावे असा हा कविता संग्रह आहे. सर्व विषयाला स्पर्श करून कवीने वाचकास एक अनोखी भेट दिलेली आहे. या कवितासंग्रहात एकूण 83 कविता आहेत. प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी आकर्षक व उठावदार मुख्यपृष्ठ साकारलं तर संजय ओरके आणि प्रशांत डोंगरदिवे यांनी आतील चित्र रेखाटले आहे. नागपूरच्या मध्यमा प्रकाशने हा संग्रह प्रकाशित करून वाचकास उपलब्ध करून दिला आहे. 144 पान असलेला या कवितासंग्रहाची बांधणी चांगली आहे. मलपृष्ठावर  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरचे मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांची पाठराखण आहे. प्रसिद्ध साहित्यिक डॉ. भूषण रामटेके यांची प्रस्तावना कवितासंग्रहातील कविता वाचावयास प्रेरित करते. अशा या आशावादी कवितासंग्रह मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.



◼️कवितासंग्रह: मी उजेडाच्या दिशेने निघालो

कवी : अरुण विघ्ने

प्रकाशन : मध्यमा प्रकाशन नागपूर

मूल्य रु. 220

________________________________


◼️पुस्तक परिचय : रमेश मुनेश्वर

स्तंभलेखक, किनवट जि.नांदेड

संवाद -७५८८४२४७३५



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)