शिक्षण प्रक्रियेतून घडली कवयित्री संगीता सावंत !
विशेष प्रतिनिधी (उमा ढेरे)
अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत महत्वपूर्ण घटक म्हणजे शिक्षक. शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील पाठ व कविता शिकवता शिकवता शिक्षकाच्या कृतीतून एक नवनिर्मिती होत असते व या निर्मितीतूनच शिक्षण क्षैत्रातील लेखन, लेखिका, कवी, कवयित्री उदयास येत असतात व त्यांच्या संकल्पनेतून साकार होत असतात साहित्यकृती.पुणे म्हणजे शिक्षणाची पंढरी. राज्याची सांस्कृतिक राजधानी.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे 'नवभारत हायस्कूल शिवणे' येथील शिक्षिका श्रीमती. संगीता संभाजी सावंत यांच्या काव्यप्रतिभेतून साकार झालेली "अक्षरलेणी" हा कविता संग्रह शिक्षकांच्या एका वेगळ्या प्रतिभेची चुणूक दाखवत आहेत. काव्यवाचन करता करता विद्यार्थ्यांना कविता समजावून देत असताना कधी स्वतः चारोळी लिहित होत्या. संदर्भ म्हणून आशयघन कविता लिहून मासिक व नियतकालिकांमधून काव्य लेखन व काव्यस्पर्धांमधून विजयाची ढाल स्वीकारत असतानाच कवयित्री हे बिरुद लागले व "अक्षरलेणी" हा एका शिक्षिकेचा कविता संग्रह शिक्षण क्षैत्रात चर्चिला गेला. "वाचें बरवें कवित्व। कवित्विं रसिकत्व। रसकतवीं परतत्वस्पर्शु। जैसा।" हे संत शिरोमणी, तत्त्वज्ञ व संत कवी श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या वंदनाने "अक्षरलेणी "हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.
काव्य म्हणजे शब्दांचा बहर, मनाचा विरह, अक्षरांची उधळण, स्वप्नांचा मागोवा, निसर्गाचे चित्रण, प्रेमाचा आविष्कार, समाजातील घटणांचा दर्पण व संगिताचा नाद कवयित्री संगीता सावंत यांनी अक्षरवेलीत विणला आहे. त्र्याहत्तर कविता या कविता संग्रहात समाविष्ट केल्या आहेत. सर्वच कविता उल्लेखनीय आहेत सर्व कवितांचे विवेचन करणे कदाचित कवयित्रीच्या काव्य संकल्पनेच्या मर्यादाला वेसन घालणे इष्ट होणार नाही म्हणूनच मी मोजक्याच मला आवडलेल्या कवितांचा उल्लेख करते. "आई "कविता म्हणजे मातृत्वाची ममता "कळी "कविता भ्रमराप्रमाणे कानात गुणगुण करते. अजरामर असलेल्या राधाकृष्णाच्या प्रेमाची कविता आजवर अनेकदा आपण ऐकली असेल वाचलीही असेल पण कृष्णमय झालेली कविता अक्षरवेलीवर बहरत जाते. या जीवनात, एक शोकांतिका, स्वप्न, तू आकाश, रात्र सरली, वेड्या मनास,संगत फुलांची, प्रेमदिवाणी , सांजवात, वेगळी वाट या कविता म्हणजे कवयित्री संगीता सावंत या शाळेतील शिक्षकेचा काव्य अविष्कार प्रकट करतो.



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .