राज्यात केंद्र प्रमुख पदोन्नती व सीएमपी प्रणाली लवकरच.. - शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी

शालेयवृत्त सेवा
1

 



महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेस आश्वासन


नांदेड  (एस.एस. पाटील ) :

राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांमधूनच केंद्र प्रमुख पदोन्नती 50% पदे व प्राथमिक शिक्षकांमधूनच 50% पदे परीक्षेद्वारे भरावीत या मागणीकडे महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने लक्ष वेधले असता याबाबत लवकरच शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंखी यांनी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळास दिले.


    नुकतीच पुणे येथे संघटना प्रतिनिधींनी शिक्षण आयुक्त यांची भेट घेऊन राज्यात 60 ते 70 टक्के केंद्र प्रमुख पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. दि.2 फेब्रुवारी 2010 च्या शासन निर्णयानुसार शिक्षकांमधून 30 टक्के, विभागीय परीक्षेद्वारे 30 टक्के व सरळसेवा परीक्षेतून 40 टक्के या प्रमाणात केंद्र प्रमुख पदे भरण्याचा निर्णय शिक्षकांवर अन्यायकारक असून सर्व पदे आवश्यक अर्हता पूर्ण करणाऱ्या कार्यरत प्राथमिक शिक्षकांमधूनच भरणे आवश्यक असल्याचे संघटनेने शिक्षण आयुक्त सोळंकी यांना सांगितले.


    तसेच शिक्षकांचे अनियमित होणारे वेतन सी.एम.पी प्रणालीद्वारे व्हावे यासाठी लवकरच त्याचे प्रारूप सादर केले जाईल व ही प्रणाली राज्यभर लागू करण्यात येईल असेही आश्वासन शिक्षण आयुक्त यांनी दिले. 


     यावेळी बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून सर्व रिक्त पदे भरावीत, सर्व उच्च प्राथमिक शाळांना मुख्याध्यापक पद मंजूर व्हावे, 3 वर्गाचे बहुवर्ग अध्यापन करणे शास्त्रीय दृष्ट्या योग्य नसल्याने इ.1 ते 5 च्या वर्गांना 60 पर्यंत किमान 3 पदे मंजूर व्हावीत, कोणाच्याही दबावाला बळी न पडता जि प शाळांना इ. 5 वी 8 वी चे वर्ग जोडावेत,  इ.1 ते 4 चे वर्ग /शाळा सुरू करण्याचे निर्देश लवकरात लवकर व्हावेत, समान काम समान वेतन नुसार 100% विषय शिक्षकांना वेतनश्रेणी मिळावी, 1 जानेवारी 2016 नंतर चटोपाध्याय लागू झालेल्या अध्यापक व पदवीधर शिक्षकांच्या वेतनत्रुटी दूर करावी, जिल्हा परिषद शाळांना शिक्षकेत्तर पद मंजूर करणे, सर्वच मुलींना दररोज किमान 10 रू. उपस्थिती भत्ता मिळावा, नपा. मनपा शाळांना पूर्ण वेतन अनुदान मिळावे आदी मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली.


      यावेळी संघटनेचे राज्य नेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, सरचिटणीस हरीश ससनकर, महिला राज्याध्यक्ष अल्का ठाकरे, उपाध्यक्ष जी.एस.मंगनाळे, राज्य संघटक पी.आर.पाटील, एस.के.पाटील, नारायण कांबळे, बाबुराव माडगे, सुनीता इटनकर, अशोक खाडे, अरुण चौधरी आदी विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

  1. M.phil,phD झालेल्या प्राथमिक शिक्षकातून केंद्रप्रमुख पदे भरावीत.नवीन पद भरती करण्या पेक्षा

    उत्तर द्याहटवा
टिप्पणी पोस्ट करा