ढ' मुलांना प्रोत्साहित करणारी बाल कादंबरी

शालेयवृत्त सेवा
0

 



साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक डॉ विरा राठोड आणि त्यांचे चिरंजीव कबीर यांनी केलेले 'ढ' या बाल कादंबरीचे समीक्षण... 



        लहान मुलांचे भावविश्व अतिशय उत्तमरित्या उलगडून सांगणारी आणि विद्यार्थ्याला समजून घेऊन त्याचं व्यक्तीमत्व बदलता येतं याची गोष्ट सांगणारी डॉ. विशाल तायडे यांची ‘ढ’ ही बालकादंबरी.


      खर तर प्रकाशनापूर्वीचा खर्डा मला वाचायला मिळाला आणि प्रकाशित झाल्या झाल्या ही बालकादंबरी हातात पडली परंतु ही कादंबरी मला माझ्या मुलांकडून वाचून घेऊन त्यावर अभिप्राय नोंदवायचा होता. मुलांच्या परीक्षा आणि अभ्यासामुळे अभिप्राय नोंदवायला उशीर झाला हे नम्रतेने कबूल करावे लागेल. असो. 


       ‘ढ‘ या बाल कादंबरीची गोष्ट आहे गजू नावाच्या एका मुलाची. या गजूची गोष्ट माझ्या मुलाला फारच आवडली. या कादंबरीतला हा गजू प्रत्येकाला नक्कीच आवडेल असाच आहे. तो या कादंबरीचा केंद्र आहे. अभ्यासात मागे असणारा गजू. उशिरा बोलायला लागलेला, बोलतांनाही अडखळणारा. यामुळे आत्मविश्वास खालावून तो एकलकोंडा बनतो. गजू अभ्यासात जरी मागे असला, त्याच्यात आत्मविश्वासाचा अभाव असला किंवा उच्चाराबद्दल न्यूनगंड असला तरी तो खूप छान चित्रे काढतो. 


      त्याला चित्रकला आणि अभिनयात आवड आहे. तो निसर्गाच्या सहवासात रमणारा आहे. 'ढ' असणाऱ्या गजूला कुणी मित्र-मैत्रिणी जवळ करीत नाहीत; परंतु गजूची फुलं, फुलपाखरं, नदी, डोंगर, झाडे यांच्याशी गट्टी जमलेली असते. 


       सांप्रतकाळी आपल्या समाजाची अशी मानसिकता झालेली आहे की प्रत्येक मूल हे पुस्तकी अभ्यासातच हुशार असायला पाहिजे, परंतु दरएक मुलांमध्ये वेगवेगळ्या क्षमता असतात. त्यांच्यात विविध कौशल्ये असतात ते ओळखून त्यानुसार त्याला संधी दिली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि मार्ग दाखवला पाहिजे असे ही कादंबरी सुचवू पहाते. 


          गजूला परीक्षेत कधीच चांगले गुण मिळत नाहीत. निकालाच्या दिवशी भीतीने त्याच्या पोटात खड्डा पडतो. कुठे तरी लपून बसावे किंवा पळून जावे, असे त्याला वाटत राहते. परीक्षेतला निकाल पाहून सर्वजण त्याला 'ढ' म्हणत असतात. परंतु गजूला समजून घेणारी घरातली माणसं, शाळेतल्या कदम बाई आणि हेड सर आपल्याला अशा मुलांच्या बाबतीत खूप काही शिकवून जातात. ते त्याला सर्वतोपरी मदत करतात. आपले सामर्थ्य आणि मर्यादा ह्या कदम बाईमुळे गजूला कळतात ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो. पुढे गजूच्या चित्रांचे प्रदर्शन प्रजासत्ताक दिनाला भरवले जाते. त्याचे सर्वजण कौतुक करतात. 


      आधी हेटाळणी करणारे परंतु मुकाभिनय बघितल्यावर छान वागणारे काळे सर तसेच आधी फार लक्ष न देणारे पण गजूच्या प्रतिभेचा शोध लागल्यावर त्याला प्रोत्साहीत करणारे वडिल या दोन्ही घटना सकारात्मक दिशादर्शन करणाऱ्या म्हणाव्या लागतील. ज्यातून डॉ विशाल तायडे हे पालक आणि शिक्षकांना सकारात्मक दृष्टिकोन सुचवू पहात आहे.


        गजू मधील कलागुणांना दिलेले प्रोत्साहन हाच या कादंबरीचा आत्मा आहे. एक शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनात किती महत्वपूर्ण बदल घडवून आणू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून या कादंबरीकडे पहावे लागेल.


       मुळात कोणताच विद्यार्थी ढ नसतो, प्रत्येकाची समज, बुद्धिमत्ता, गती आणि आवड वेगवेगळी असते याचे कथन करणारी ही बाल कादंबरी आहे असे म्हणावे लागेल. शिक्षकांच्या, शाळेच्या प्रयत्नांना पालकांनी समजून घेतले आणि योग्य प्रतिसाद दिला तर 'ढ' म्हणून हिणवल्या जाणारा विद्यार्थी देखील जीवनात यशस्वी होऊ शकतो असा संदेश लेखकाने दिलेला आहे. 


        ही कादंबरी सहज सोप्या भाषेत छोट्या छोटया गोष्टींवर सूचकपणे भाष्य करत राहते. भावात्मकता, निसर्ग प्रेम, जिव्हाळा, उपक्रमशीलता अशा अनेक बाबी उजागर करीत जाते. मनात अनेक उपक्रमांची दाटी होऊ लागते. कादंबरीची सहज बालसुलभ ओघवती चित्रमय भाषा आहे जी वाचता वाचता भान विसरायला लावते. 


       प्रत्येक विद्यार्थ्याने आणि पालकांनी देखील 'ढ' ही बाल कादंबरी आवर्जून वाचली पाहिजे. या कादंबरीचा आनंद मी आणि माझा मुलगा कबीर याने घेतला. त्याला देखील ही बालकादंबरी मनापासून आवडली. त्याची तत्काळ प्रतिक्रिया होती की ‘’पप्पा गजूची गोष्ट एकदम भारी आहे.‘’ डॉ. विशाल तायडे यांचे “ प्राण्यांचा वॉट्स अप आणि इतर कथा “ हे देखील त्याचे आवडते पुस्तक आहे. ही प्रतिक्रियाच सांगून जाते की मुलांना “ढ “ खूप आवडली आहे. 



-डॉ. वीरा राठोड आणि बालवाचक चि. कबीर राठोड 

प्रकाशक - सौरव प्रकाशन, छत्रपती संभाजी नगर 

संपर्क - ९९२२८ ६९९५७

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)