जागर स्त्रीशक्तीचा ! - श्रीकांत गोरशेटवार

शालेयवृत्त सेवा
0

 



सबंध विश्वामध्ये ८ मार्च रोजी स्त्रीच्या आणि स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी महिला दिन साजरा केला जातो. स्त्री शक्तीचा जागर या दिवशी विशेषत्वाने करण्याचे कारण म्हणजे पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये स्त्रियांना समानतेची वागणूक आणि मतदानासारख्या अधिकारांना सुरुवात झाली. म्हणून दरवर्षी ८ मार्चला 'जागतिक महिला दिन' साजरा करण्याची प्रथा युरोप, अमेरिकेत सुरु झाली आणि नेहमीप्रमाणे पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करणारे आम्ही भारतीयही आमची तेजस्वी अन् ओजस्वी परंपरा विसरुन लागलो त्यांच्याप्रमाणे करायला !!! 

भारतीय संस्कृती मुळात अतिशय प्राचीन आहे. अगदी प्राचीन काळापासून इथल्या जडणघडणीत महिलांचा मोठाच वाटा राहिला आहे. ज्याकाळी दुसर्‍या राष्ट्रांत महिला आपल्या हक्कांसाठी लढत, झगडत होत्या त्यापेक्षाही फार पूर्वीपासून आपल्या इथे स्त्रियांना सन्मानाची, समानतेची आणि अतिशय गौरवाची वागणूक मिळत असल्याचे आपल्या प्राचीन ग्रंंथामध्ये सांगीतले आहे. मनुस्मृतीमधील 

'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः|' 

हा श्लोक त्याकाळातील परिस्थितीचे वास्तव दर्शन करुन द्यायला पुरेसे आहे. 

अनेक कथा, कहाण्या, ग्रंथ तसेच तत्कालिन साहित्यांतून स्त्रियांची तुलना कुठेही पुरुषांबरोबर झालेली नाही तर त्यांना पुरुषांएवढाच समानतेचा अधिकार प्राप्त होता. अगदी दैवतांच्या प्रतिकांमध्येही हे आपण सहजपणे पाहू शकतो. पण काळाच्या ओघात आपली दिव्य संस्कृती आपल्याच हातून नष्ट होत गेली आणि आपण स्वतःहून पाश्च्यात्यांच्या वळचणीला केव्हा जाऊन उभे राहिलो हेही आपल्या ध्यानीमनी आले नाही. वैदिक काळातील स्त्रियांना तर यज्ञादी कार्यात पौरोहित्य करण्याचाही अधिकार होता. प्राचीन काळातील स्त्रियांचाही दर्जा बरोबरीचा आणि समानतेचा तर होताच पण त्यात सन्मानाची भावनाच अधिक. मध्ययुगीन काळ तसा फार बदलाचा आणि परीवर्तनाचा म्हणावा लागेल.

सद्यपरिस्थितीत महिलांना मिळणारी वागणूक कायद्याच्या आधारे समानतेची असली तरी अनेक ठिकाणी कोणाच्याच खिजगणतीत नसलेली स्त्री प्रजाती कितीतरी काळापासून दुर्लक्षीत जीवन जगत असल्याचे लाजिरवाणे चित्र आपल्याच देशात बहुतांश ठिकाणी पाहायला मिळू शकते.

लिंगाधारित सजीवांमध्ये कधीही मादी प्रजाती श्रेष्ठच ठरली कारण या सृष्टीच्या सर्जनामध्ये अन् वर्धनामध्ये यांचा वाटा सिंहाचा !! अर्थात यात नराची भूमिका असली तरी त्यांच्याकडून नेहमीच हीनतेचा अनुभव दिला गेला. कायिक, मानसिक आणि वाचिक स्वरुपात उपभोग्य दृष्टीने स्त्रीकडे पाहिल्या गेले.  


'स्त्री ही क्षणाची पत्नी तर अनंत काळाची माता आहे.....' या सूत्राप्रमाणे सृष्टीच्या पुनरुत्थानात स्त्रियां स्वतः अमूल्य अन् अतुल्य योगदान देऊन, आपल्या वात्सल्याने न्हाऊ-माखू घालून, आपल्या ओथंबलेल्या ममतेने सांभाळून तसेच प्रसंगी कणखर बनून मोठे महनीय कार्य त्यांच्याकडून सदोदीत घडले. निसर्गाकडूनच स्त्रियांना उच्च स्थानाचे वरदान प्राप्त आहे. खडतर परिस्थितीत समायोजनाचे दिव्य आयुध स्त्रियांनी नेहमीच सक्षमतेने आणि कौशल्याने पेलले आहे. संसारात आपले सर्वस्व ओतताना त्या कधीही आपला हात आखडता घेत नाहीत तर प्रसंगी रणचंडीका बनून दुष्टांचे दमन करण्यास कधीही त्या कचरल्या नाहीत. अशा दोन्ही स्वरुपात त्या परिणामकारकच सिद्ध झाल्या. कधी कधी आपल्याच माणसांपुढे त्या हतबल दिसतीलही पण ती त्यांची अगतिकता असते. आपल्या माणसांवर मायेचा, प्रेमाचा अन् वात्सल्याचा वर्षाव समरसरुन करताना स्वतःचे अस्तित्वही विसरुन जातात. या सगळ्यांमधून त्यांचे श्रेष्ठत्वच दिसून येते. त्यामुळे आताच्या स्त्रियांना आपण कुठेही कमी नाही, आपल्यात कुठलीही उणीव नाही, आपणही प्रत्येक काम पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून करु शकतो हे दाखवण्याची अहमहिका लागलेली पाहून मन खिन्न होते. कदाचित समाजाकडून सतत होणार्‍या हेटाळणीतून आणि मुख्य म्हणजे स्त्रियांनी स्त्रियांना दिलेल्या दुय्यम स्थानामुळे अन् स्वतःला सतत गौण समजल्याने त्यांच्यातल्या काही महत्वाकांक्षी जणींकडून स्वतःला सिद्ध करण्याची धडपड दिसते. खरंतर दुसर्‍यांनी गौरवल्याने कोणीही सुखावतो. त्यामुळेच की काय स्त्रियाही अन्य कुणाकडून गौरवण्याची आशा तर बाळगत नसतील ? असे असेल तर हे खरंच निराशाजनक आहे. आपल्या अस्तित्वाची चाहूल कर्तृत्वातून घ्यायला भाग पाडून त्याच बळावर आपल्या गौरवगाथांच्या पताका सातत्याने फडकत ठेवण्यासाठी अन्य कुणाच्या कुबड्यांची गरजच ती काय ? पुरुषप्रधान संस्कृतीत वावरताना स्वतःच्या वाट्याला नेहमीच दुय्यम भूमिका मिळणार आणि त्यातूनही मी स्वतःला सिद्ध करणार अशा नैराश्याच्या वातावरणात वावरण्याची गरजच ती काय ? स्वतःमधले आदिशक्तीच्या स्वरुपाची ओळख करुन घ्यायला कुठला अन्याय सहन करण्याची गरजच ती काय ?

'तू अबला, तू ललना न तू सैरंध्री,

तू दुर्गा, तू चंडी ऊठ पुरंध्री' या कवनातून अभिप्रेत असलेल्या रुपात प्रत्यक्षात येण्यासाठी अशा कुबड्यांच्या जंजाळातून स्वयंसिद्धतेने बाहेर येऊन इथल्या व्यवस्थेच्या छाताडावर तांडव करीत सणसणीत चपराकीने निद्रिस्त समाजमनाला खडबडून जागे करण्यासाठी आपण पुरेसे आहोत ही पक्की खूणगाठ मनाशी बांधली तरच अनादिअनंत काळापासून गौरविले गेलेले  परमपुजनीय रुप पुन्हा एकदा प्रतिबिंबित होण्याची शक्यता अधिक आहे. स्त्री शक्तिचा जागर करताना या अशा विविध स्वरुपातून परिवर्तनाची नांदी ठरेल यात काही शंका नाही.



-श्रीकांत द. गोरशेटवार,

बार्‍हाळी, ता.मुखेड

7588525292

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)