प्र'बुद्ध' हो मानवा..... बालासाहेब लोणे

शालेयवृत्त सेवा
0

 




तथागत सिध्दार्थ गौतम बुध्द, शाक्यमुनी बुध्द, सम्यक सम्मा संबुध्द हे महान तत्ववेत्ते, समस्त मानव सृष्टीसह चराचरांचे जीवन समृध्द, संपन्न व सुखकर करण्यासाठी जगाला वैज्ञानिक दृष्टीकोन असलेला बौद्ध धम्म देणारे महान समाजसुधारक. जगाच्या एकंदरीत जडणघडणीत तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या बौध्द धम्माचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे.

       

तथागत गौतम बुध्दाने जगाला वैज्ञानिक दृष्टीकोन, बुध्दीप्रामाण्यवाद, निरेश्वरवाद, विचार स्वातंत्र्य, समता, बंधूता, सामाजिक न्याय, सद्भावना,शिक्षणास प्रोत्साहान, कलासक्त जीवन, सामाजिक,आर्थिक, राजनैतिक व आंतरराष्ट्रीय सलोखा व ऐक्य ही तथागत भगवान बुद्धांनी जगाला दिलेली देण आहे. जागतिक पातळीवरिल आज जी कांही शांतता नांदताना दिसते, देशांदेशांतर्गत आंतराराष्ट्रीय सामंजस्य करार ही बुद्धांच्या जागतिक समस्त मानवी कल्याणाच्या दूरगामी विचारांचाच परिपाक आहे.

        

सिध्दार्थ गौतम बुध्द हे वर्तमानातील सर्वात श्रेष्ठ बुध्द आहेत. बुध्द हे नाव नसुन ती ज्ञानाची उपाधी आहे. बुध्द या शब्दाचा अर्थ आकाशा एवढा महाज्ञानी किंवा प्रज्ञावान. तथागत भगवान गौतम बुद्धांना हे ज्ञान कोणत्याही चमत्कारातून प्राप्त झालेले नाही तर त्यांनी ते स्वयंप्रयत्नांतून व आपल्या राजघराण्यांचे विद्वान राजगुरु व अध्यात्मिक  राजगुरूजनांच्या व पराक्रमी महायोध्दे यांच्या मार्फत अर्जित केलेले आहे. आचार्य रजनिश (ओशो) तथागत गौतम बुध्दा बद्दल लिहताना म्हणतात, " मागच्या दोन हजार वर्षापासून गौतम बुध्दांनंतर गौतम बुद्धाच्या जवळपास जावू शकेल असा महामानव भारतानेच काय जगाने आजपर्यंत निर्माण केलेला नाही. जागतिक महाप्रकांड पंडीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लाखों अनुयायांसह तथागत भगवान गौतम बुध्द यांचे व त्यांच्या बौध्द धम्माचे अनुनयेत्व स्विकारतात. बुध्दाचा वैज्ञानिक दृष्टीकोन व निरेश्वरवाद हा मानव मुक्तीसाठी क्रांतिकारी ठरणार असे प्रतिपादन करतात, यातच तथागत भगवान गौतम बुद्धांचे मोठेपण व श्रेष्ठत्व सिध्द होते.


इग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापिठाने जगभरात मागील १० हजार वर्षात आपल्या बुध्दीमत्तेच्या जोरावर मानवजातीच्या कल्याणाचे महान कार्य करणाऱ्या १०० लोकांची यादी बनविले यात तथागत भगवान गौतम बुध्द यांना क्रमांक एकचे स्थान दिले तर त्यांचे शिष्य प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दुसरे स्थान दिलेले आहे. म्हणुन ही जगातली सर्वश्रेष्ठ व प्रज्ञावान गुरुशिष्य म्हणून या दोघांचा समावेश होतो. २०१० च्या जागतिक लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार संपूर्ण जगात तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या धम्मानुयायींच्या संख्या २३० कोटी म्हणजे २.३ मिलिनियम होती.आज वर्तमानातील संख्या यात मिसळ्यात हा आकडा खूपच वाढू शकेल. म्हणजे जगात बौध्द होणे सोपे आहे. बुद्धांची शिकवणही अतिशय सोपी परंतू आचरणास कठीण आहे. म्हणजे कोणालाही बौद्ध धम्माचा अनुयायी होता येईल परंतू बौध्दापासुन सभ्यक संबुद्ध म्हणजे प्रबुध्द होण्याचा आचरण मार्ग स्वप्रयत्नाचा व कष्टप्रत आहे. मानवाने केवळ बौद्ध होवून भागत नाही तर आपल्या जीवन सुखकर करण्यासाठी प्रबुद्ध म्हणजे प्रज्ञावान, शिलवान व दयावान व्हावे लागणार आहे.

             

राजपुत्र सिद्धार्थ गौतमांचा राजपुत्र सिध्दार्थ गौतम ते सम्यक संबुध्द बनण्याचा प्रवास हा खूपच रोमांचक अन उत्कंठावर्धक आहे. सिध्दार्थ गौतम बुद्धांचा जन्म चक्रवर्ती सम्राट राजा शुद्धोधन व महाराणी महामाया यांच्या पोटी इसपू ५६३मध्ये झाला. सिध्दार्थाच्या वयाच्या सातव्यावर्षी महाराणी महामाया यांचे निधन झाले. महाराजा शुध्दोधनानी सिद्धार्थांची मावशी व महाराणी महाराणी महामाया यांची लहान बहिण राजपुत्री महाप्रजापती गौतमी हिच्याशी विवाह केला. महाप्रजापती गौतमीनेच सिध्दार्थाचा स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त सांभाळ केला. मावशी व सावत्रआईच्या प्रेमामुळेच महाप्रजापती गौतमीच्या नावावरून तथागत स्वतःचे नाव सिद्धार्थ गौतम असे लावायचे. हे भगवान बुध्दांनी मातृशक्तीचाच केलेला आदर आहे.

          

तत्कालीन शाक्य राजघराण्याच्या प्रथा परंपरेप्रमाणे सिध्दार्थ गौतमाचा वयाच्या १६ व्या वर्षी राजकुमारी यशोधरा हिच्याशी विवाह झाला. यथावकाश सिध्दार्थ गौतम व राजकुमारी यशोधरा यांना राहुल नावाचा एक मुलगा झाला. वयाच्या २९ वर्षापर्यंत म्हणजे एकुण १३ वर्ष  सिध्दार्थ गौतम बुध्दाने वैवाहिक जीवन व्यतित केले.

          

राजपुत्र सिध्दार्थ गौतमाने आपल्यानंतर आपला उत्तराधिकारी चक्रवर्ती सम्राट व्हावा यासाठी महाराजा शुध्दोधनांनी प्रयत्न सुरूच होते. शुध्दोधनांनी लहानपणांपासुनच राजपुत्र सिद्धार्थ गौतमाला राजकारभार, शस्त्र, शास्त्र, धर्म, घोडदौड,न्यायनिवाडा, राजनिती, अर्थनिती, परराष्ट्रनिती याचे परिपूर्ण शिक्षण अतिशय विद्वावान राजगुरूंमार्फत दिलेले होते. महाराजा शुध्दोधन सिध्दार्थ गौतमात भावी चकवर्ती सम्राट पाहत होते. परंतू सिध्दार्थ गौतमाला चक्रवर्ती सम्राट बनण्यात फारसे स्वारस्य नव्हते. तर सिद्धार्थ गौतमाला जगाला मानवमुक्तीचा मार्ग दाखविण्याचे स्वप्न खुणावत होते. वयाच्या २९ व्या वर्षी पत्नी यशोधरेच्या संमती घेवून बाळ राहुल याचे चुंबन घेवून घोडयांचा टापांचा आवाज होवू नये यासाठी चन्न कंठक नावाच्या घोडयाच्या खूरांना कापड बांधून एका पावसाळ्या रात्री सिध्दार्थ गौतम  राजमहालाबाहेर पडले.

         

सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सर्वसंग पारित्याक  केल्यानंतर राजगृह येथून जीवनक्रम सुरु केला. तथागत गौतम बुध्दांचे २९ व्या वर्षापर्यंत राजमहालात विद्वान राजगुरूंकडून परिपूर्ण शिक्षण झालेच होते परंतू ज्ञानाच्या शोधात असताना तथागत गौतम बुद्धांनी आणखी दोन गुरुंचे शिष्यत्व स्विकारले.

      

सिध्दार्थांची प्रगती पाहून या दोन्ही गुरूंनी सिध्दार्थांना आपले अध्यात्मिक वारस म्हणून जाहिर केले, परंतू अध्यात्मिक मार्ग न पत्कारता बुद्धांनी व त्यांच्या पाच संन्याशी मित्रांसह ज्ञान प्राप्तीसाठी ऐहिक सुखाचा त्याग करुन आत्मक्लेषी ज्ञानाचा मार्ग स्विकारला. मात्र आत्मक्लेषी वा तपाच्या मार्गाने ज्ञान मिळत नाही तर शरीराला केवळ खूप यातना मिळतात. हे तथागत बुद्धांनी सप्रमाण सिध्द केले.आत्मक्लेषी ज्ञान मार्गाचा त्याग करुन मध्यम मार्ग म्हणजे ध्यानधारणा व चिंतनाचा मार्ग पत्करला.     

          

तथागत सिध्दार्थ गौतम बुद्ध बोधगया येथील पिंपळवृक्षाच्या झाडाखाली ध्यान व चिंतनाला बसले. आयुष्यात आजपर्यंत प्राप्त ज्ञान व ध्यानधारनेतील चिंतनातून गौतम बुद्धांना वयाच्या ३५ व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेलाच संबोधी, बुध्दत्व वा निर्वाण प्राप्ताची आत्मानुभूती झाली. त्या दिवशीपासुनच लोक त्यांना बुद्ध म्हणजे अतिशय ज्ञानी पुरुष संबोधू लागले.

        

अशा संबोधी, बुद्धत्व आत्मानूभूती प्राप्त तथागत गौतम बुद्धांनी उत्तरप्रदेशातील सारनाथ येथे पाच पंडितांना बौद्ध धम्माचा पहिला उपदेश केला त्यात तथागत गौतम बुध्द "बौद्ध धम्माची" परिकल्पना मांडतांना बुध्द म्हणतात..

१ ) माझ्या धम्मात ईश्वर (देव),आत्मा, कर्मकांड याला अजिबात स्थान असणार नाही.

२) मरणोत्तर कोणत्याच जीवनाशी म्हणजे पुर्नजन्म, आत्मा, पाप याला माझ्या धम्मात स्थान असणार नाही.

 ३) मानव व मानवी जीवन व त्यांचे कल्याण हे माझ्या धम्माचा केंद्रबिंदू राहिल.

४) मनुष्यप्राणी दुःख, दैन्य, दारिद्रयात राहतो. जग दुःखाने भरलेले आहे. मानवांचे दुःख नाहिसे करून त्यांचे जीवन सुखकर करणे माझ्या धम्माचा उद्देश आहे.

५) दुःखाचे अस्तित्व मान्य करून दुःख मुक्तीचा मार्ग दाखविणे माझ्या धम्माचा पाया आहे.

६) मी मार्गदाता आहे, मुक्तिदाता नाही.

   तथागत भगवान गौतम बुध्दांचा सारनाथ येथील उपदेश बौध्द धम्माची चौकट स्पष्ट करतो.

तथागत भगवान गौतम बुद्धांची खालील बाबींवरून आपल्या अनुयायांना बौध्द धम्माची शिकवण दिली. 


चार आर्यसत्य..

१ ) मानवी जीवन दुःखमय आहे.

२) दुःखांची निर्मिती वासना वा आशेतून होते.

३) दुःखाचे निवारण आपल्या इच्छा/आशांवर नियंत्रण ठेवून करता येते.

४) दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा अष्टांगिक मार्ग अवलंबिला पाहिजे.


अष्टांगिक मार्ग..

तथागत गौतम बुद्धांनी मानवी जीवन सुखकर होण्यासाठी सदाचारांना अत्यंतिक महत्व दिलेले आहे. मानवी जीवन सुधारण्यासाठी तथागतांनी आठ मार्ग सांगितले आहेत. त्यालाच अष्टांगिक मार्ग असे म्हणतात*

१) सम्यक दृष्टी २ ) सम्यक संकल्प ३ ) सम्यक वाचा ४ ) सम्यक कर्म ५ ) सम्यक उपजिविका ६) सम्यक व्यायाम ७) सम्यक स्मृती ८ ) सम्यक समाधी


धम्माचे तीन अंगे..

तथागत भगवान गौतम  बुध्दांनी धम्माची तीन अंगे सांगितली आहेत.

१) शिल म्हणजे सदाचार

२) समाधी ( शरीर, वाणी व मन ताब्यात ठेवणे).

३) प्रज्ञा (ज्ञान)


दहा पारमिता..

तथागत भगवान बुद्धांनी जगण्याचे दहा मार्ग सांगितले आहेत. त्याला दहा पारमिता म्हणतात..

१) शिल पारमिता २) दान पारमिता ३) उपेक्षा पारमिता ४) नैष्कर्म पारमिता (ऐहिक सुखाचा त्याग) ५) विर्य पारमिता (सामर्थशिल कर्म) ६) शांता पारमिता(क्षमाशिलपणा) ७) सत्य पारमिता (खरेपणा) ८) अधिष्ठान पारमिता (दृष्टीकोन) ९) करुणा पारमिता (दया) १०) मैत्री पारमिता (बंधूभाव)


पंचशील..

तथागत गौतम बुद्धांनी आनंदी, परिपुर्ण व आदर्श जीवन जगण्यासाठी पंचशिल सांगितले आहेत.

१) मी जीव हिंसेपासुन अलिप्त राहिल.

२) मी चोरी करणार नाही.

३) मी कामवासना व अनाचारापासुन अलिप्त राहिल.

४) मी खोटे बोलणार नाही.

५) मी मादक द्रव्यांचे सेवन (नशापान) करणार नाही.


तथागतांचा भिक्खू संघ..

तथागत गौतम बुद्धांनी बौध्द धम्माच्या प्रसार व प्रचाराबरोबर बौध्द धम्म रक्षणाची व धम्म चळवळ वाढविण्याची सर्वात मोठी जबाबदारी भिक्खू संघावर टाकलेली आहे. तथागतांच्या भिक्खू संघात महिला भिक्खूनी संघ सुद्धा होता. भिक्खू संघातील सदस्यांसाठी ज्ञान व अनुभवांवरुनभिक्खू संघाची विशिष्ट प्रकारची स्तरीय रचना करण्यात आली होती. भिक्खू संघात जीवन व्यतित करण्यासाठी कठोर नियम घालून दिलेले होते. भिक्खू संघाला कोणत्याही प्रकारचा धनसंचय अमान्य होता. सदैव धम्माच्या प्रचार अन प्रचारासाठी भिक्खू संघाने प्रवास करावा परंतू आषाढात म्हणजे पावसाळा सुरू होताच वर्षावासात विहारात एका ठिकाणी थांबून भिक्खूनी चिंतन, मनन व ज्ञानसाधना करावे.


पुढे बौध्द धम्मावरिल वैदिक आक्रमण काळात याच भिक्खू संघातील लाखो भिक्खूनी बौद्ध धम्माच्या प्रसार, प्रचार व रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देवून बौध्द धम्माचे रक्षण केले आहे.

   राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेच्या पान क्र.८१ वर तथागत गौतम बुध्द व भिक्खू संघाच्या कार्याविषयी लिहताना म्हणतात..

हाती न घेता तलवार ;

बुद्ध राज्य करी जगावर ;

त्याशी कारण एक प्रचार...प्रभावशाली. !


बुद्धांचे महापरिनिर्वाण..

कुशीनगर येथे इसपू ४८३ मध्ये  वयाच्या ८० व्या वर्षी तथागत गौतम बुद्धांचे वैशाखी पौर्णिमेलाच महापरिनिर्वाण झाले. तथागत भगवान बुद्धांच्या सबंध आयुष्यात योगायोगाने जन्म, ज्ञानाची आत्मानूभूती व महापरिनिर्वाण हया तीनही घटना वैशाखी पौर्णिमेच्या दिवशीच घडलेल्या असल्यामुळे ही वैशाखी पौर्णिमा बुध्द पौर्णिमा वा बुध्दजयंती म्हणून जगभर ओळखली व साजरी केली जाते. आज तथागत भगवान गौतम बुध्द समस्त विश्वाचे  आदर्श व अढळ विश्वासाचे स्थान बनलेले आहेत.

           

तथागत भगवान गौतम बुध्द या महान चिंतक, महान मार्गदाता, महान तत्ववेत्ता,महान वैज्ञानिक व महान समाजसुधारकांस विनम्र विनम्र आदरांजली व आपणां सर्वांना बुध्दजयंतीच्या हार्दीक हार्दीक मंगल कामना. भवत्तू सब्ब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण होवो. 



 - बालासाहेब लोणे, नांदेड

9421756489 (Wts) / 8975401662


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)