जिल्हा परिषद मराठी शाळा पोपटखेड, त.आकोट, जिल्हा अकोला येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले कवी महेंद्र सुभाषराव काकड यांचा 'माय' हा व-हाडी,मराठी भाषेतील कवितासंग्रह नुकत्याच संपन्न झालेल्या ७व्या अ.भा. व-हाडी साहित्य संमेलन,आकोट येथे प्रकाशीत करण्यात आला. छोटेखानी ८० पृष्ठसंख्या असलेल्या या कवितासंग्रहात एकूण ६५ रचना आहेत. कवी हे मुळचे सातेगाव,त.अंजनगाव,जि.अमरावती येथील रहिवासी असून सद्या ते आकोट येथे वास्तव्यास आहेत. व-हाडाचे सुपूत्र असल्याने त्यांचे व-हाडी बोलीवर प्रेम आहे. हे त्यांच्या विविध रचनेतून उजागर होते. ते एका साधारण कुटुंबातील असून त्यांचं शिक्षण एम.ए.बी.एड्.पर्यंत झालेलं आहे. शेतीमातीशी त्यांची नाळ जोडलेली असून ते संवेनशील मनाचे कवी आहेत. भावनिक आहेत.त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांचं जगणं,वाचन,अनुभव, अवलोकन, चिंतन, मनन यातून त्यांनी आपल्या हृदयाच्या कप्प्यात बंदिस्त असलेल्या भावना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. विविध विषयांरील रचना या पुस्तकात आहेत. एकूण ६५ पैकी प्रेम या विषयाला अनुसरून विविध आशय लेऊन आलेल्या एकूण १० रचना आढळतात.
जशा..प्रेमाचा इतिहास,आर्त हाक,सौंदर्याची राणी,पायटी पायटी,प्रेम, वेदना, एन्जाॅमेंट, विश्वासघात, पाखरु,सखे साजनी,विरह, इत्यादी .यास्तव एकूण १२ रचना विविध व्यक्तिरेखांवर ,महापुरुष यांच्या जीवनकार्यावर आधारीत आहेत. जशा...तुकोबा,शिवबा,सावित्रीबाई फुले,पांडुरंग,नरसिंग महाराज,गाडगेबाबा,गुरू गजानन,तुकडोजी,वृषाली ,अटलजी,राजा शिवाजी, इत्यादी. काही रचना सन,रीतीभाती,शेती,पीक,पाणी,पाऊस या विषयावरील आहेत. दोन रचना राजकारणाशी निगडीत आहेत. तर तीन चार रचना शिक्षण,शाळेशी संबंधीत आहेत.पर्यावरण,भारत देश,कोरोना,माय-बाप,मित्र,पंगत,फॅशन,लेक,महिला दिन,स्वाभिमान गणगोत,माय माऊली इत्यादी स्वतंत्र विषयावरील एकेक रचना आढळते. एकूणच कविने आपल्या अवतीभोवतीचं निरीक्षण करून त्या विषयाची मांडणी कवितेतून केली आहे. सर्वच कविता या अल्पाक्षरीतील आहेत. काही मुक्तछंदातील तर काही गीत रचना आहेत. बहुतांश कविता या लयबद्ध आणि साध्या शब्दातील आहेत.
'माय' या कवितासंग्रहातील पहिली व शिर्षक कविता म्हणजे 'माय' .आईचं महत्व हे प्रत्येकाच्या आयुष्यात कमी-अधिक सारखच असतं. आई कुणालाही जवळचीच असते. तशी कविलाही आहेच. मायविषयी ते म्हणतात...
"मायी माय कष्टकरी
निरा झिजत रायते
परिवाराच्या सुखासाठी
समिधेसारखी जयत रायते !"(पृष्ठ क्र.१३)
मायची महती वर्णन करणारी ही रचना व-हाडी बोलीत आहे. व-हाडी बोलीचा गोडवा या रचनेतून कळतो. कविच्या कवितेतील 'माय' ही शेतात राबणारी दिसते, आपल्या कुटुंबासाठी कष्टणारी आहे. तिला कविने अनेक उपमा विशेषणांनी गौरविले आहे.'प्रकाशाची वाट' ही रचना ऊर्जादायी आहे. जीवन जगणा-याला धीर देणारी रचना आहे. 'गोतावळा' या रचनेतून सकारात्मक भाव व्यक्त होतो .एकता,आनंद,प्रेम याचे प्रतीक आहे.ती हेवेदावे विसरून मानवाला आनंदाने जगण्यास प्रेरीत करते. तर 'भाऊबीज' ही भाऊ आणि बहीण यांच्यातील निर्मळ,निस्वार्थ,प्रेमळ नात्याची गुंफण आहे.
'लेक आणि 'लेक सासरी जाई' या दोन रचना लेक आणि बापाच्या नात्याशी व तिच्या जीवनाशी संबंधीत आहेत. प्रत्येकच लेक आपल्या बापाची लाडकी असते. ती सासरी जातांना मात्र बापाच्या मनपटलावर तिच्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतात. त्याच्या एका डोळ्यात आनंदाचे तर दुस-या डोळ्यात दु:खाचे अश्रू असतात. बाप कधीच रडत नाही.मात्र लेक सासरी जातांना एकांतात तरी का होईना ? तो हमसून हमसून रडतो. तिच्या रुपाने तो आपल्या काळजाचा तुकडा दुस-याच्या हाती सोपवित असतो. तेव्हा त्याच्या मनात तिच्या भविष्याची चिंता असते. कविही एका मुलीचा बाप आहे. त्यामुळे लेकीबाबतच्या त्यांच्या काय भावना आहेत ? या रचनेतून शब्दबद्ध केल्या आहेत.
कविच्या मनात आपल्या देशाप्रतीही आपुलकीची भावना आहे. जर आमच्या देशाकडे कुणी वाकड्या दृष्टीने बघितले तर त्यांच्यासाठी 'सावधानतेचा' इशारा देतांना दिसतात. आमचा देश हा शांती,अहिंसा पाळणारा देश आहे. पण वेळ पडल्यास आम्ही जशास तसे उत्तर देण्यास मागे पुढे बघणार नसल्याची तंबीही विरोधकांना देतांना दिसतो.
" शांतीचा देश आमचा
अहिंसेचा मार्ग धरू
कोणी घेतलेत खेटे त
टेंपे आता लावून देऊ ! (पृष्ठ क्र.३२)
'राजा शिवाजी' आणि 'शिवबा' या दोन्ही रचना प्रेरणादायी आहे. त्यांचं शासन हे रयतेप्रती सहानुभूतीचे होते. शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकरी,स्त्रीयांचे संरक्षण होत होते. कवी म्हणतात
"पानाच्या देठाला शेतक-याच्या
कुणी हात लावत नव्हते
तुझ्याच काळात खरेखुरे
प्रजेचे राज्य नित्य होते!"(पृष्ठ क्र. ६८)
कर्मयोगी संत गाडगेबाबांविषयी कृतज्ञता व्यक्त करतांना कवी म्हणतात....
"मानवतेचे पुजारी तुम्ही
विदर्भाची छान (शान)
गाडगेबाबा तुमचा
आम्हाला अभिमान !"( पृष्ठ क्र.४०)
संत गाडगेबाबांनी मानवाच्या आतील आणि बाहेरील स्वच्छतेला कायम महत्व दिले.साधी राहणी पण उच्च विचारसरणी होती. त्यांनी लोकांसाठी दशसुत्री सिद्धांत दिला. अज्ञानी असतांनाही अनेक लोक त्यांच्या जीवन कार्यावर पी.एच.डी.करतात. हे विशेष.
कुणाचेही माय- बाप असो, ते आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र झटत असतात. माय -बापाशिवाय घराला घरपण नसते. ही भावना व्यक्त करतांना कवी म्हणतात....
"राबराब राबते बाप
माय त्याले साथ देते
घराले घरपण
माय -बापानेच येते! "(पृष्ठ क्र.४१)
ही भावस्पर्शी रचना व-हाडी बोलीतील असून वाचक मनाला भिडल्याशिवाय राहत नाही.
'मित्र' हे नातं रक्तापलीकडचं पण वेळ आली तर जीवाला जीव देणारं असतं. ती कविता बघू...
"संकटात धीर देतो मित्र
आनंदाचा वाटेकरी मित्र
वेगवेगळे जरी गोत्र
हवा एक मित्र !" (पृष्ठ क्र.४३)
मित्राची महती अतिशय सुंदर शब्दात कविने अधोरेखीत केली आहे.
प्रेम या विषयावर आधारीत भरपूर रचना आहेत. पण प्रेम हे निर्मळ,निस्वार्थ,निरपेक्ष असलं पाहिजे.
आणि कविचीही भावना अशीच आहे.ते म्हणतात..
" सोडून जरी गेली तरी
मागे पाहू नको
वेदनेच्या त्या गावी
मला नेवू नको ! (पृष्ठ क्र.५७)
कविने आपल्या पूर्णांगीनीला उद्देशून एक रचना केली आहे. पती- पत्नी जीवन रथाची दोन चाकं आहेत. एक जरी कमजोर असलं,निखळून पडलं तर संसाराचा गाडा पुढे जात नाही.त्यासाठी दोघांच्या नात्यातील वीण ही घट्ट असावी लागते.हे विशेष. पत्नी वृषालीविषयी ते म्हणतात....
"सेवेचा वसा घेऊनी
रात्रंदिन तू झटते
परिवारासाठी आपल्या
किती कष्ट तू घेते ! " (पृष्ठ क्र.६२)
शिक्षक हा कुंभारापरी असतो. तो कच्चा मडक्यांना आकार देतो. गुरुची भूमीका ही आई-वडीलांनंतरची महत्वाची असते. मुलं घडली तर कुटुंब घडते,कुटुंब घडले तर समाज घडतो,समाज घडला तर गाव,तालुका,जिल्हा,प्रदेश पर्यायाने देश घडत जातो.
" शील,क्षमा,कर्तव्य
आकार तव घ्यावे
हजारो विद्यार्थी
तुझ्या हातून घडावे !" ( पृष्ठ क्र.६९)
कविने देशाकडून एक रास्त अपेक्षा केली आहे.आमचा देश कधीतरी विश्वगुरू व्हावा.भारत देश हा विभिन्नतेने नटलेला असला तरी एकता आहे. ही संविधानाची,लोकशाहीची देन आहे.
" वेगवेगळे धर्म अमुचे
वेगवेगळे प्रांत
तथागतांचे पाईक आम्ही
शांतता आमचा मंत्र !" (पृष्ठ क्र.५१)
वरील सुंदर व सकस अशा ओळीतून भारताची महानता दिसून येते. हा देश तथागत बुद्धाचा आहे. जो सर्व विश्वात परीचित आहे. त्याने जगाला शांतीचा संदेश दिला आहे.
एकूणच 'माय' हा कवितासंग्रह आशय,विषयाच्या दृष्टीने सर्वसमावेशक आहे . साध्या शब्दात महत्वाचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. कविने आपले अनुभव व मनातील निर्मळ भाव शब्दबद्ध केले आहे. पुस्तक छान झाले.व-हाडी बोलीमध्ये अधिक अस्सलपणा आणण्याची गरज वाटते.या पुस्तकाला समर्पक व न्यायपूर्ण प्रस्तावना जेष्ठ व-हाडी साहित्तिक,कादंबरीकार पुष्पराजदादा गावंडे यांनी लिहिली असून पाठराखण जेष्ठ कवी विठ्ठल कलट यांनी प्रभावी शब्दात केली आहे. यातील निलेश कवडे यांचा शुभेच्छा संदेशही मोलाची भर घालणारा आहे. मुखपृष्ठ आकर्षक,व शिर्षकाच्या दृष्टीने आशयघन व परीपूर्ण आहे. एका कष्टकरी आईचं जीवन साकारण्याचा प्रयत्न केला आहे. सदर पुस्तक शब्दशिल्प प्रकाशन,नागपूर यांनी प्रकाशीत केले आहे. या सुंदर कलाकृतीसाठी कवी महेंद्र काकड यांचे अभिनंदन व पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा देतो.
अरुण हरिभाऊ विघ्ने
मु.पो.रोहणा
त.आर्वी,जि.वर्धा
कवितासंग्रहाचे नाव : 'माय'
कविचे नाव : महेंद्र काकड
प्रस्तावना : पुष्पराजजी गावंडे
पाठराखण : विठ्ठल कुलट
प्रकाशन संस्था : शब्दशिल्प प्रकाशन,नागपूर
मूल्य : १५०/- रुपये


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .